गस्तीवर असलेल्या पोलिसांना बोगस बीटी बियाण्यांचे घबाड सापडलं, यवतमाळमध्ये 48 लाखाचं बियाणे जप्त
यवतमाळमध्ये गस्तीवर असलेल्या पोलिसांना बोगस बीटी बियाण्यांचं घबाड सापडलं. गाडी रिवर्स घेऊन पळ काढणाऱ्या व्यक्तीचा संशय आल्याने पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. गाडीची तपासणी केली असता त्यात 48 लाख किंमतीचं 30 क्विंटल बोगस बियाणे सापडलं.
यवतमाळ : गस्तीवर असलेल्या पोलिसांना बोगस बीटी बियाण्यांचं घबाड सापडल्याची घटना यवतमाळमध्ये घडली. रवींद्र बंधाटे असं बोगस बीटी बियाण्यांची तस्करी करणाऱ्या व्यक्तीचं नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या वाहनात सुमारे 48 लाख किंमतीचे 30 क्विंटल बोगस कापूस बियाणे आढळून आले आहेत.
यवतमाळ तालुक्यातील जोडमोहा भागात ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी रात्री तीनच्या सुमारास उशिरा गस्तीवर होते. त्यावेळी त्यांना एक व्यक्ती संशयास्पद स्थितीत जोडमोहा-कळंब मार्गावर दिसला. परंतु जोडमोहा गावाजवळ पोलिसांचं वाहन पाहाताच त्याने आपली चारचाकी रिवर्स घेतली आणि तिथून पाऊण किलोमीटर पळ काढला. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी वाहनाचा पाठलाग केला आणि वाहन थांबवून वाहनाची तपासणी केली. यावेळी गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस बियाण्यांचं घबाड आढळून आलं. सुमारे 48 लाख किंमतीचे 30 क्विंटल बोगस कापूस बियाणे त्यात सापडलं. या प्रकरणी पोलिसांनी वटबोरी इथल्या रवींद्र बंधाटेला अटक केली आहे. तर त्याच्या इतर साथीदार आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत.
खरीप हंगामात शेतकरी मोठ्या प्रमाणात कपाशीच्या बियाण्याची लागवड करतात. त्याच हंगामात तस्करांकडून बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारलं जातं. त्यामुळे बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्यांची पाळेमुळे पोलिसांनी पायमुळ खोदून काढली तर अशा तस्करी करणांऱ्यावर आळा बसेल.