एक्स्प्लोर
पोलिस सीएमच्या सभेत, शेतकऱ्याचा मृतदेह 3 तास झाडाला लटकून
चंद्रपूर : चंद्रपूरमध्ये कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे मूलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत बंदोबस्तावर असलेले पोलिस आत्महत्येची माहिती दिल्यानंतर तब्बल तीन तासांनी घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे तीन तास शेतकऱ्याचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत होता.
चंद्रपूर जिल्ह्यातल्या मारोडा-भादूर्णी परिसरात उमेश चहाकाटे नावाच्या शेतकऱ्याने आत्महत्या केली. गरिबी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा चंद्रपूर जिल्ह्यातल्या मूलमध्ये सुरु होती. माजी मुख्यमंत्री मा. सा. कन्नमवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ बांधण्यात आलेल्या सांस्कृतिक सभागृहाच्या उद्घाटन प्रसंगी ही सभा ठेवण्यात आली होती. या सभेत मुख्यमंत्री राज्याचा वाढलेला कृषी विकास दर आणि शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या योजनांवर पोटतिडकीने भाषण देत होते.
दुसरीकडे त्याच सभास्थळापासून दहा किलोमीटरवर असलेल्या मारोडा-भादूर्णीच्या एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. 50 वर्षीय उमेश चहाकाटे यांच्याकडे फक्त एक एकर शेती होती. तीही तिघा भावांमध्ये मिळून. कुटुंबात तीन मुली, एक मुलगा आणि बायको. दोन वर्ष आधी मोठ्या मुलीचं त्यांनी लग्न लावलं. या लग्नामुळेच कर्जबाजारी होऊन त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज
व्यक्त करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा सर्वांच्याच चिंतेचा विषय असला तरी त्याबद्दल प्रशासन किती असंवेदनशील आहे, याचा अनुभव यावेळी आला. ही आत्महत्या गावाच्या अगदी जवळ झाल्यामुळे गावच्या उपसरपंचाने लगेच पोलिसांना फोन करून याची वर्दी दिली. मात्र मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या बंदोबस्तात व्यस्त असलेले पोलीस तब्बल तीन तासांनी घटनास्थळी दाखल झाले. विशेष म्हणजे मूल पासून या
गावचं अंतर अवघं 8 ते 20 किलोमीटर असतांना पोलिसांना पोहचायला तीन तास लागतात यातच शेतकऱ्यांची स्थिती अधोरेखित होते.
गावकरी पोलिसांना घटनास्थळी पोहचायला तब्बल तीन तास लागल्याचे सांगत या प्रकरणावर रोष व्यक्त करत आहेत. मात्र पोलिस त्यांना उशीर झाल्याचं अमान्य करत आहेत. आत्महत्येची तक्रार एक ते दीड वाजता आल्याचं पोलिस सांगत असले तरी मोबाईलच्या जमान्यात ही गोष्ट पटण्यासारखी नाही. तरी उशीर झाल्याच्या आरोपाची चौकशी करु असं सांगून पोलीस प्रकरण थंड करण्याचा प्रयत्न करत आहेत.
शेतकरी आत्महत्या हा जरी फार गुंतागुंतीचा विषय असला तरी या प्रकरणावर किमान प्रशासनाने संवेदनशीलता दाखवणे आवश्यक आहे. फक्त मुख्यमंत्र्याच्या बंदोबस्तात व्यस्त असल्यामुळे पोलिसांना एका शेतकऱ्याचा मृतदेह झाडावरुन काढायला तीन तास लागणार असतील तर समाजासाठी ही लाजिरवाणी बाब आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
क्राईम
राजकारण
क्रिकेट
Advertisement