Sharad Pawar: लोकसभेप्रमाणे विधानसभेत 'तुतारी'समोर पिपाणीचं आव्हान, शरद पवारांच्या दोन मागण्या मान्य पण...
Sharad Pawar: राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाने तीन विनंत्या केल्या होत्या, त्यातील दोन विनंत्या निवडणूक आयोगाने मान्य केल्या आहेत, तर पिपाणी न देण्याची मागणी अमान्य केली आहे.
पुणे: लोकसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला त्यांच्या चिन्हामुळे काही ठिकाणी फटका बसला होता. त्यांचं चिन्ह हे तुतारी वाजवणारा माणूस आहे, मात्र, अशाच प्रकारचे तुतारीचे चिन्ह काही उमेदवारांना मिळाल्याने त्यावेळी मतदारांचा गोंधळ उडाल्याने काही ठिकाणी मतांचा फटका सोसावा लागला होता. यावेळी असा प्रकार टाळण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने निवडणूक आयोगाकडे तीन विनंत्या केल्या होत्या. त्यापैकी दोन मागण्या निवडणूक आयोगाने मान्य केल्या आहेत.
काय होत्या राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाच्या तीन विनंत्या?
पहिली विनंती : राज्य पक्ष म्हणून मान्यता दिली होती. निधी स्वीकारण्यास मान्यता द्यावी
निवडणूक आयोगाचा निर्णय: ही मागणी मान्य करण्यात आली आहे.
दुसरी मागणी : तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह, वोटिंग मशीनवर लहान दिसतं, ते मोठं करावं
निवडणूक आयोग : वोटिंग मशीनवर चिन्ह कसं दिसावं, त्यांनी तीन पर्याय दिले होते, त्यापैकी पहिला पर्याय स्वीकारला आहे.
तिसरी मागणी: ट्रम्पेट हटवावं
निवडणूक आयोग : तुतारी वाजवणारा माणूस आणि ट्रम्पेट हे वेगळं दिसतं त्यामुळं हटवता येणार नाही हे सांगितलं.
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेवेळी बोलताना केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले, राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाच्या तीन विनंत्या आल्या होत्या. त्यापैकी राज्य पक्ष म्हणून मान्यता दिली होती. त्याचप्रमाणे आता त्यांना निधी स्वीकारण्यास मान्यता देण्यात आली आहे. तर तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह, वोटिंग मशीनवर लहान दिसतं, ते मोठं करावं त्याप्रमाणे त्यांना दिलेल्या पर्यायापैकी त्यांनी पहिला पर्याय मान्य केला आहे, आता ते चिन्ह मोठं दिसेल. तर तिसरी त्यांची मागणी होती. ट्रम्पेट हटवावं, मात्र, तुतारी वाजवणारा माणूस आणि ट्रम्पेट हे वेगळं दिसतं त्यामुळं हटवता येणार नाही हे सांगितलं.
लोकसभेला 'तुतारी वाजवणारा माणूस' ऐवजी 'पिपाणी'ला मतं
'तुतारी वाजवणार माणूस' हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे निवडणूक चिन्ह आहे. दुसरीकडे निवडणूक आयोगाने काही अपक्ष उमेदवारांना पिपाणी हे निवडणूक चिन्ह दिले होते. त्यामुळे मतदारांचा गोंधळ झाला आणि 'तुतारी वाजवणारा माणूस' ऐवजी 'पिपाणी'ला अनेक ठिकाणी मतदान अधिक झाल्याचा राष्ट्रवादीने दावा केला होता. सातारा, दिंडोरी, रावेर, भिवंडी, शिरूर अशा जागांवर पिपाणी या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला मोठी मत मिळाली होती.
पिपाणी चिन्ह असणाऱ्यांना किती मतं?
रावेर, दिंडोरी, भिवंडी, बारामती, शिरुर, अहमदनगर, बीड, सातारा या जागांवर पिपाणी या चिन्हांवर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना कित्येक मतं पडली होती. रावेर या जागेवर पिपाणी चिन्हावर निवडणूक लढवणारे एकनाथ साळुंके यांना 43 हजार 957 मतं पडली होती. त्याच प्रमाणे दिंडोरी या जागेवरून बाबू भगरे (सर) यांना 1 लाख 3 हजार 632 मते पडली. भिवंडी जागेवर कांचन वखरे यांना 24 हजार 625 मते मिळाली. बारामती या जागेवर शेख सोएलशहा यांना 14 हजार 917 मते पडली. शिरुरमध्ये मनोहर वाडेकर यांना 28 हजार 324, अहमदनगरमध्ये गोरख आळेकर यांना 44 हजार 597, बीडमध्ये अशोक थोरात यांना 54 हजार 850 मते, साताऱ्यात संजय गाडे यांना 37 हजार 62 मते पडली होती. यावेळी देखील याचा फटका बसण्याची शक्यता आहे.