(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राज्यातील गरिबांच्या हक्काची पॅसेंजर ट्रेन बंदच, दररोज 40 लाख सामान्य प्रवाशांना बसतोय फटका
राज्य व केंद्र सरकारने सर्वसामान्यांच्या होणारी गैरसोय बघता लवकर पॅसेंजर ट्रेन टप्प्या टप्प्याने का होईना सुरू करावी अशी मागणी आता राज्यातील रेल्वे प्रवाशी संघटना करत असल्याचं समोर आले आहे.
बुलडाणा : कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून साधारणतः एप्रिल 2020 पासून मुंबई नागपूर मार्गावरील रेल्वेने सर्वच प्रवासी गाड्या बंद केल्या होत्या. मध्यंतरी काही प्रवासी गाड्या सुरूही केल्या होत्या. पण पुन्हा दुसरी लाट आली म्हणून बंद केल्या आहेत. या मार्गावर अनेक प्रवासी एक्स्प्रेस गाड्या सुरू आहेत. पण अजूनही सर्व सामान्यांच्या प्रवास करण्याची जीवनवाहिनी म्हणून समजल्या जाणाऱ्या पेसेंजर गाड्या मात्र अद्याप बंदच आहेत. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांची गैरसोय होत असून महागड्या एक्सप्रेस गाड्या या आरक्षित राहत असून त्याच भाडं सुद्धा जास्त असते. अनेक एक्स्प्रेस गाड्या सुरू आहेत त्याने कोरोना वाढत नाही का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. त्यामुळे नागपूर मुंबई मार्गावर पेसेंजर गाड्या सुरू करून सर्वासमान्य प्रवाशाना दिलासा द्यावा अशी मागणी आता समोर येत आहे.
मध्य रेल्वेचे मुख्य जन संपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिलेल्या माहितीनुसार मध्य रेल्वेच्या राज्यात अनेक रेल्वे पॅसेंजर गाड्या बंद आहेत.
किती प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो?
- राज्यात जवळपास रेल्वेच्या मध्य , पश्चिम , कोंकण आणि दक्षिण मध्य विभागात 82 पॅसेंजर ट्रेन बंदच आहेत.
- एकट्या मध्य रेल्वेच्या जवळपास 45 पॅसेंजर ट्रेन बंदच आहेत.
- भुसावळ रेल्वे विभागात फक्त दोन पॅसेंजर ट्रेन सुरू आहेत. भुसावळ - सुरत आणि भुसावळ - नंदुरबार.
- राज्यातील 45 पॅसेंजर ट्रेन बंद असल्याने जवळपास 40 लाख प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागतो.
- सध्या फक्त एक्स्प्रेस ट्रेन सुरू असून त्याच भाडं जास्त असून त्या रिझर्व्ह असल्याने सामान्य प्रवासी प्रवास करू शकत नाही.
- पॅसेंजर ट्रेन बंद असल्याने रोज जवळपास 40 लाख प्रवाशांना बस किंवा खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे.
- एक्स्प्रेस ट्रेनने कोरोना वाढत नाही का? असा सामान्य लोकांच्या मनात प्रश्न उभा राहत आहे.
- पॅसेंजर ट्रेन बंद असल्याने सामान्य प्रवाशांचं नुकसान तर होतच पण रेल्वेचंही करोडो रुपयांचं नुकसान होत आहे.
यामुळे कोरोना आता नियंत्रणात असून लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्या सुरू आहेत. राज्य व केंद्र सरकारने सर्वसामान्यांच्या होणारी गैरसोय बघता लवकर पॅसेंजर ट्रेन टप्प्या टप्प्याने का होईना सुरू करावी अशी मागणी आता राज्यातील रेल्वे प्रवाशी संघटना करत असल्याचं समोर आले आहे.
गोरगरिबांची प्रवासाची हक्काची पॅसेंजर रेल्वे गाडी गेल्या दीड वर्षांपासून बंद असल्याने लाखो गोरगरीबांची बाहेरगावी जाण्याची कुचंबणा होत आहे. लॉकडाऊनच्या कारणाने बंद केलेली पेसेंजर ट्रेन आता कोरोना नियंत्रणात आल्याने ज्याप्रमाणे एक्स्प्रेस ट्रेन सुरू आहेत त्याच धर्तीवर पॅसेंजर ट्रेन सरकारने सुरू करून गरीब जनतेला न्याय द्यावा ही मागणी आता जोर धरत आहे.