महायुतीत मिठाचा खडा? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावरच घ्याव्यात, भाजप नेत्याची मागणी, हवं तर आमची परीक्षा घ्या
पुढच्या काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच राजकीय पक्षांनी हालचालींना सुरुवात केली आहे.

Maharashtra Politicis News : पुढच्या काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच राजकीय पक्षांनी हालचालींना सुरुवात केली आहे. अशातच काही पक्षांचे नेते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर घेण्याची मागणी करत आहेत. परभणी जिल्ह्यात आमची स्वबळाची तयारी आहे. त्यामुळं इथं स्वबळावरच निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी केली आहे. भुमरेंच्या या मागणीने परभणीत महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे.
शहर असो की जिल्ह्यातील ग्रामीण भाग सगळीकडे भाजपचे प्राबल्य
परभणीत पक्षाने एकदा आमची परीक्षा घ्यावी आणि स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर घ्याव्यात, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी केली आहे. परभणी जिल्ह्यात आमची स्वबळाची तयारी असल्याचे ते म्हणाले. परभणी जिल्ह्यामध्ये भाजपची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. शहर असो की जिल्ह्यातील ग्रामीण भागात भाजपचे प्राबल्य आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था या सर्व निवडणुका पक्षाने स्वबळावर घेऊन आमची परीक्षा घ्यावी, आमची सर्व तयारी पूर्ण झालेली आहे आणि त्याच अनुषंगाने या सर्व निवडणुका स्वबळावर घ्याव्यात अशी मागणी भाजपचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी आज पत्रकार परिषद घेत पक्षाचे आभार मानले. शिवाय त्यांनी या पत्रकार परिषदेत थेट स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळं आता महायुतीमधील शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाच ठरणार आहे.
सध्या राज्यात महायुतीचे सरकार आहे. हे सरकार भाजप, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचे आहे. यामध्ये सर्वाच मोठा पक्ष हा भाजप आहे. त्यांनतर शिवसेना आणि राष्ट्रवादी आहे. विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं होतं. विशेषत: भाजपने जागांचा मोठा आकडा पार केला आहे. त्यानंतर आता स्तािक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये काही नेते स्वबळावर निवडणुका लढण्याची मागणी करत आहे. मात्र, भाजपच्या बड्या नेत्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी महायुती म्हणूनच लढणार असल्याचे सांगितले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन टप्प्यात होण्याची शक्यता
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन टप्प्यात होण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2017 च्या प्रभाग रचनेनुसार करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. मात्र या निवडणुकांसाठी तब्बल एक लाख 'ईव्हीएम' यंत्रांची आवश्यकता असल्यानं या निवडणुका दोन टप्प्यांत होण्याची शक्यता आहे. राज्यातील 687 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या तीन ते पाच वर्षांपासून झालेल्या नाहीत. त्यामुळे बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांवर सध्या प्रशासक आहेत. निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाला तब्बल एक लाख 'ईव्हीएम'ची आवश्यकता भासणार आहे.
महत्वाच्या बातम्या:























