एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भुजबळांच्या तब्येतीची काळजी घे, उद्धव ठाकरेंचा पंकजला सल्ला
छगन भुजबळ हे राष्ट्रवादीत येण्याआधी शिवसेनेत होते. मात्र राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर शिवसेना आणि भुजबळ कुटुंबीय यांच्यातील संबंध तणावाचेच राहिले आहेत.
मुंबई : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर भेट झाली. छगन भुजबळ यांनीच पंकज भुजबळ यांना 'मोतश्री'वर जाण्यास सांगितल्याची माहिती मिळते आहे. छगन भुजबळ यांची गेल्या आठवड्यात तुरुंगातून जामिनावर सुटका झाली, त्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे.
सुमारे 15 मिनिटं उद्धव ठाकरे आणि पंकज भुजबळ यांची भेट झाली. या भेटीवेळी मिलिंद नार्वेकर हेसुद्धा उपस्थित होते. छगन भुजबळ यांना जामीन मिळाल्याने, पंकज भुजबळ पेढे घेऊन उद्धव ठाकरेंना भेटण्यास गेले होते.
छगन भुजबळ यांच्या तब्येतीची काळजी घेण्याचा सल्ला उद्धव ठाकरेंनी पंकज भुजबळ यांना दिला.
चर्चांना उधाण
छगन भुजबळ हे राष्ट्रवादीत येण्याआधी शिवसेनेत होते. मात्र राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर शिवसेना आणि भुजबळ कुटुंबीय यांच्यातील संबंध तणावाचेच राहिले आहेत. मात्र भुजबळांच्या जामिनावर सुटकेनंतर शिवसेनेने ‘सामना’ या आपल्या मुखपत्रातून भुजबळांची बाजू घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे आधीच राजकीय चर्चांना वेग आला होता. आता पंकज भुजबळांनी ‘मातोश्री’ची पायरी चढल्याने या चर्चांना आणखी उधाण आले आहे.
‘सामना’त शिवसेनेने भुजबळांबद्दल काय म्हटले होते?
“भुजबळ शिवसेनेशी व शिवसेनाप्रमुखांशी वाईट वागले. महाराष्ट्र सदन उभारण्यात घोटाळा झाला नसल्याचे सत्य तेव्हा फक्त ‘सामना’नेच छापले. आम्ही व्यक्तिगत वैर ठेवत नाही. भुजबळ सुटले. त्यांच्या कुटुंबीयांना नक्कीच आनंद झाला असेल. भुजबळांनी त्यांच्या प्रकृतीकडे जास्त लक्ष द्यायला हवे. ते जामिनावरच सुटले आहेत याचे भान त्यांनी सदैव ठेवायला हवे. सुज्ञांस अधिक काय सांगावे!”, असे सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने म्हटले आहे.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पंकज भुजबळ यांची ‘मातोश्री’भेट अत्यंत महत्त्वाची गोष्ट मानली जाते आहे.
भुजबळ आता थेट मैदानात, जाहीर भाषणाची तारीख ठरली!
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची आर्थिक प्रकरणात दोन वर्षांनी जामिनावर सुटका झाल्यानंतर, त्यांच्यावर केईएममध्ये उपचार सुरु आहेत. आता तिथून बाहेर पडल्यानंतर भुजबळ थेट मैदानातच उतरणार आहेत. पुण्यात 10 जून रोजी राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेचा समारोप होणार आहेत. या समारोपाच्या कार्यक्रमात छगन भुजबळ हे भाषण करणार आहेत.
तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर छगन भुजबळ यांना भेटण्यासाठी कार्यकर्ते उत्सुक आहेत. काही कार्यकर्त्यांनी केईएम हॉस्पिटलमध्ये जाऊन भुजबळांची भेट घेतली. मात्र सर्वसमान्य कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी भुजबळ समोर कधी येतील, याची उत्सुकता सर्वांनाच होती. मात्र आता हल्लाबोल यात्रेच्या समारोपाच्या सभेतच भुजबळ भाषण करतील, हे निश्चित झाले आहे.
भुजबळ सुटले!
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना 4 मे रोजी जामीन मंजूर झाला. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. तब्बल दोन वर्षांनी छगन भुजबळ बाहेर आले.
मुंबई उच्च न्यायालयाकडून भुजबळांचं वय लक्षात घेत जामीन मंजूर केला. भुजबळांना 5 लाखांचा जामीन मंजूर झाला. बोलावतील तेव्हा चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहणं, साक्षीदारांना प्रभावित न करणं, या अटींवर छगन भुजबळांना जामीन मंजूर झाला.
दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी मनी लाँडरिंग कायद्याखाली छगन भुजबळ अटकेत होते. सर्वोच्च न्यायालयाने पीएमएलए कायद्याचे 45(1) हे कलम नुकतेच रद्द केलं. त्याचा फायदा घेत आपली जामीनावर मुक्तता करावी, अशी भुजबळ यांची मागणी होती.
14 मार्च 2016 रोजी छगन भुजबळांना अटक
पैशांची अफरातफर आणि बेहिशेबी मालमत्ताप्रकरणात ईडीने छगन भुजबळांना 14 मार्च 2016 रोजी रात्री अटक केली होती. भुजबळांच्या अटकेनंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. अंमलबजावणी संचालनालयाने तब्बल 11 तास छगन भुजबळांची चौकशी केली आणि त्यानंतर त्यांना अटक केली होती.
संबंधित बातमी
छगन भुजबळांना नेमकी कोणत्या प्रकरणात अटक?
छगन भुजबळांची चौकशी आणि अटकेचा संपूर्ण घटनाक्रम
कलम 45 घटनाबाह्य, छगन भुजबळांना दिलासा मिळणार?
‘माझ्यावरील आरोप खोटे, दमानियांवर कायदेशीर कारवाई करु’, भुजबळांचं जेलमधून पत्र
भुजबळ लढवय्ये, ते जेलबाहेर आले पाहिजेत: मंत्री दिलीप कांबळे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement