Pandharpur : 18 दिवसानंतर विठुरायाचे राजोपचार सुरु, देवाचा थकवटा दूर करण्यासाठी आज होणार प्रक्षाळ पूजा
आषाढी यात्रेनंतर (ashadhi wari) विठुरायाचा थकवटा दूर करण्यासाठी आज देवाची प्रक्षाळ पूजा होणार आहे
Pandharpur : आषाढी यात्रेनंतर (ashadhi wari) विठुरायाचा थकवटा दूर करण्यासाठी आज देवाची प्रक्षाळ पूजा होणार आहे. 18 दिवसानंतर आजपासून देवाचे राजोपचार होणार सुरु आहे. परंपरेनुसार आषाढीला देशभरातून येणाऱ्या लाखो भाविकांना दर्शन देण्यासाठी देवाचा पलंग काढून 24 तास दर्शनासाठी मंदिर उघडे ठेवण्यात येत असते. यावेळी देवावरील सर्व राजोपचार बंद करुन 24 तास दर्शन सुरु असते.
19 जूनपासून सुरु होते 24 तास दर्शन
आषाढी यात्रेसाठी गेल्या 18 दिवसापासून अहोरात्र दर्शनासाठी उभ्या असलेल्या विठुरायाच्या प्रक्षाळ पुजेस आज सकाळी सुरुवात झाली. परंपरेनुसार आषाढीला देशभरातून येणाऱ्या लाखो भाविकांना दर्शन देण्यासाठी देवाचा पलंग काढून मंदिर 24 तास दर्शनासाठी उघडे ठेवण्यात येत असते. यावेळी देवावरील सर्व राजोपचार बंद करून 24 तास दर्शन सुरु असते. यंदाही राज्यभरातून 12 लाखांपेक्षा जास्त भाविकांनी आषाढी वारीसाठी फंढरपुरात दाखल झाले होते. परंपरेनुसार 19 जून रोजी देवाचा पलंग काढून देव 24 तास दर्शनासाठी उभा होता. आज ( 7 जुलै) तब्बल 18 दिवसानंतर पुन्हा देवाचा पलंग बसवण्यात येणार असून, देवाच्या प्रक्षाळ पूजेस सकाळपासून सुरुवात केली जाणार आहे.
17 प्रकारच्या आयुर्वेदिक वनस्पतींचा काढा देवाला दाखवला जाणार
देवाचा थकवटा घालवण्यासाठी देवाच्या अंगाला लिंबू साखर चोळून गरम पाण्याने स्नान घातले जाणार आहे. याचसोबत देवाच्या अंगावर पांढरे वस्त्र टाकून त्यावरुन देवाला गरम पाण्याचे मंत्रोपचारात स्नान घालण्यात येणार आहे. यानंतर देवाची महापूजा करताना देवाला दूध, गंधासह पंचामृत आणि केशरपाण्याने अभिषेक करण्यात येणार आहे. यानंतर विठ्ठल-रुक्मिणी चौखांबी, सोळखांबी येथे सुगंधी फुलांनी सजवून देवाला पारंपरिक दागिन्याने मढवण्यात येणार आहे. आज 18 दिवसानंतर विठ्ठल-रुक्मिणीला निद्रा मिळणार असल्याने रात्री 17 प्रकारच्या आयुर्वेदिक वनस्पतींचा काढाही देवाला दाखवला जाणार आहे. गेले 18 दिवसापासून देवाच्या पाठीमागे लावलेला कापसी लोड आणि रुक्मिणी मातेच्या पाठीशी लावलेला कापसाचा तक्या सकाळी हटवला जाईल. आज 18 दिवसानंतर विठुराया आणि रुक्मिणी मातेला शांत निद्रा मिळणार आहे. देवाला हे सर्व उपचार होत असताना देवाच्या चेहऱ्यावरील भाव बदलत जात असल्याची अनुभूती पदोपदी जाणवत राहते . सुरुवातीला थकलेला देवाचा चेहरा पूजेनंतर मात्र अत्यंत तेजस्वी आणि प्रसन्न झाल्याचे पाहावयाला मिळते.
महत्त्वाच्या बातम्या: