एक्स्प्लोर
नगरपालिका निवडणूक : पालघर जिल्ह्यात शिवसेना, तर नंदुरबारमध्ये काँग्रेस
नंदुरबार आणि आणि पालघर जिल्ह्यात झालेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेनेने यश मिळवलं आहे, तर भाजपला पालघर आणि नंदुरबार जिल्ह्यात फटका बसला आहे.
पालघर/नंदुरबार : गुजरातचा निकाल काहीही लागला असला तरी राज्यातील नगर पालिका निवडणुकीतलं चित्र वेगळं आहे. नंदुरबार आणि आणि पालघर जिल्ह्यात झालेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेनेने यश मिळवलं आहे, तर भाजपला पालघर आणि नंदुरबार जिल्ह्यात फटका बसला आहे.
आदिवासी विकास मंत्री असलेल्या विष्णू सावरा यांना पालघर जिल्ह्यात चांगलाच हादरा बसला आहे. त्यांची कन्या निशा सावराचा वाडा नगर पंचायतीमध्ये पराभव झाला. तर नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर पालिकेत भाजपला खातंही उघडता आलं नाही.
विष्णू सावरांच्या मुलीचा पराभव
पालघर जिल्ह्यातील नवनिर्मित वाडा नगर पंचायतीबरोबरच जव्हार आणि डहाणू नगर परिषदांचे निकाल जाहीर झाले. यामध्ये वाडा नगर पंचायत ही आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात होती. मात्र तिथे शिवसेनेचा विजय झाला. शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीतांजली कोलेकर यांना मतदारांनी पसंती दिली, तर सावरा यांची कन्या निशा सावराचा पराभव झाला. वाडा नगर पंचायतीत शिवसेना 6, भाजप 6, काँग्रेस 2 ,बविआ 2 आणि राष्ट्रवादी 1 असं पक्षीय बलाबल आहे.
जव्हार नगरपरिषदेत शिवसेनेने बाजी मारली आहे. शिवसेनेचे भिकुंभाई पटेल हे नगराध्यक्ष पदासाठी निवडून आले असून त्यांनी भाजप आणि प्रतिष्ठान आघाडीचे भरत पाटील यांचा 232 मतांनी पराभव केला. येथे शिवसेना 9, राष्ट्रवादी 6, भाजप 1, प्रतिष्ठान आघाडी 1 असं पक्षीय बलाबल आहे.
डहाणू नगर परिषदेवर भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळवलं आहे. भाजपचे भरत राजपूत हे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. भाजप 15, राष्ट्रवादी 08, शिवसेना 2 असं पक्षीय बलाबल आहे.
नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेसचं वर्चस्व
अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या नंदुरबार नगर पालिकेवर सत्ता कायम ठेवण्यात काँग्रेसला यश आलं आहे. या ठिकाणच्या काँग्रेस-शिवसेना युतीने भाजपाचा पराभव करत विजय संपादन केला.
काँग्रेस आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या पत्नी रत्ना रघुवंशी आणि अंमळनेरचे आमदार शिराष चौधरी यांचे बंधू रविंद्र चौधरी यांच्यात काट्याची टक्कर असल्याने या लढतीकडे संपूर्ण खांन्देशचं लक्ष होतं. मात्र काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रत्ना रघूवंशी 4 हजार 781 मतांनी विजयी झाल्या. पालिकेत 39 जागांपैकी 24 जागांवर काँग्रेस आणि 4 जागांवर शिवसेना, तर भाजपचे 11 उमेदवार निवडून आले.
नवापूर पालिकेतही काँग्रेसने अबाधित वर्चस्व ठेवलं. या ठिकाणी काँग्रेसच्या हेमलता पाटील या 1742 मतांनी विजयी झाल्या. तर 20 नगरसेवक संख्या असलेल्या नवापूर पालिकेत काँग्रेसचे 14, राष्टवादीचे 4, शिवसेना आणि अपक्ष असे प्रत्येकी 1 नगरसेवक निवडून आले. विशेष म्हणजे या पालिकेत भाजपला खातंही उघडता आलं नाही.
दरम्यान तळोदा पालिकेतील काँग्रेसच्या ताब्यात असलेली सत्ता काबीज करण्यात भाजपाला यश आलं. तळोदा पालिकेत भाजपचे अजय परदेशी हे 1390 मतांनी नगराध्यक्षपदी निवडून आले. इथे भाजप 11, काँग्रेस 0, तर शिवसेना 1 असं पक्षीय बलाबल आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement