Sindhutai Sapkal Funeral Live : अनाथांची माय हरपली! पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचं हृदय विकाराच्या झटक्यानं निधन
Sindhutai Sapkal : पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचं हृदय विकाराच्या झटक्यानं निधन वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सिंधुताई सपकाळ यांचे पार्थिव पुण्यातील ठोसर बाग स्मशानभूमीत आणण्यात आलय आणि शासकीय मानवंदना जातेय.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाबद्दल भावना व्यक्त करत म्हणाले,"सिंधुताईंच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. आईच्या ममतेनं हजारो अनाथांचा सांभाळ करणारी ती मातृदेवताच होती. त्यांच्या अचानक जाण्यानं समाजसेवेतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या समाजजीवनात आपल्या कामाने आदर्श निर्माण करणारी, अनेक निराधारांच्या आयुष्यातील मायेची सावली हरपली आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताईंना भावपूर्ण श्रद्धांजली".
एक ट्वीट करत पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे की, डॉ.सिंधुताई सपकाळ यांनी केलेल्या समाजसेवेसाठी त्या नेहमी स्मरणात राहतील. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक मुलं चांगल्या दर्जाचे आयुष्य जगू शकली. त्यांनी उपेक्षित लोकांसाठी खूप मोठं काम केलं आहे. त्यांच्या निधनाने अपार दु:ख झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो. ओम शांती, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
सिंधुताई सपकाळ यांच्या निधनानंतर देशभरातून शोक व्यक्त केला जात असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चित्रकार सुमन दाभोलकर स्टोन आर्टच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. सिंधुताई सपकाळ यांचं स्टोन आर्ट साकारून सुमन दाभोलकर यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. दगडाला कोणत्याही प्रकारचा आकार न देता त्यावर पेंटिंग करत सुमन दाभोलकर यांनी सिंधुताई सपकाळ यांचं स्टोन आर्ट साकारलं आहे.
पार्श्वभूमी
अनाथांची माय हरपली! पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचं हृदय विकाराच्या झटक्यानं निधन, आज दुपारी अंत्यसंस्कार
अनाथांची माय अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचं काल रात्री पुण्यातल्या गॅलक्सी रूग्णालयात निधन झालं. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील गॅलक्सी रूग्णालयात सिंधुताईंवर उपचार सुरू होते. सामाजिक अत्याचारांना बळी पडलेल्या सिंधुताईंनी महाराष्ट्रात अनाथाश्रम स्थापन केलेत. त्यांना अन्न, शिक्षण आणि निवारा उपलब्ध करुन दिला. 'अनाथांची माय' असलेल्या सिंधुताई यांच्या जाण्यानं त्यांची लेकरं पोरकी झाली असून संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहेत. सिंधुताई सपकाळ यांच्यावर आज दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी अनाथांसाठी केलेले कार्य लक्षात घेऊन त्यांना अनेक पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 2021 सालचा पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता. तसेच त्यांना पुणे विद्यापीठाचा 'जीवन गौरव पुरस्कार' आणि महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. 'अनाथांची माय' अशी ओळख असलेल्या सिंधुताईंना तब्बल 750 हून अधिक पुरस्कारांने गौरवण्यात आलं आहे.
सिंधुताईंच्या जीवनावर आधारलेला 'मी सिंधुताई सपकाळ' हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर भार्गव फिल्म्स ॲन्ड प्रॉडक्शनचा ’अनाथांची यशोदा’ या नावाचा अनुबोधपट 2014 साली प्रदर्शित झाला आहे.
सिंधुताई यांनी स्थापन केलेल्या संस्था
- बाल निकेतन हडपसर, पुणे
- सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह , चिखलदरा
- अभिमान बाल भवन, वर्धा
- गोपिका गाईरक्षण केंद्र, वर्धा ( गोपालन)
- ममता बाल सदन, सासवड
- सप्तसिंधु महिला आधार बालसंगोपन व शिक्षणसंस्था, पुणे
माईंनी आपल्या कार्यासाठी आंतरराष्ट्रीय निधी मिळावी या हेतूने 'मदर ग्लोबल फाउंडेशन'ची स्थापना केली. माईंच्या जीवनावर आधारलेला 'मी सिंधुताई सपकाळ' हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर भार्गव फिल्म्स ॲन्ड प्रॉडक्शनचा ’अनाथांची यशोदा’ या नावाचा अनुबोधपट 2014 साली प्रदर्शित झाला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -