DDCA President Felicitates Virat Kohli : जवळजवळ 13 वर्षांनंतर विराट कोहलीचे रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन पण तो सपशेल अपयशी ठरला. अरुण जेटली स्टेडियमवर दिल्लीकडून रेल्वेविरुद्ध खेळताना विराट पहिल्या डावात फक्त 6 धावा करून आऊट झाला. विराटचे फलंदाजीतून पुनरागमन चांगले झाले नाही, पण तरीही दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनने (DDCA) हा सामना त्याच्यासाठी खास बनवला. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी 100 कसोटी सामने खेळण्याचा पराक्रम केल्याबद्दल डीडीसीएने किंग कोहलीचा विशेष सन्मान केला.
दिल्ली आणि रेल्वे यांच्यात खेळल्या जाणाऱ्या रणजी ट्रॉफी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी 31 जानेवारी रोजी विराट कोहलीला हा विशेष सन्मान मिळाला. दिवसाचा खेळ संपल्यानंतर डीडीसीएचे अध्यक्ष रोहन जेटली यांनी विराटला एक खास ट्रॉफी आणि शाल देऊन सन्मानित केले. 100 कसोटी सामने खेळल्याबद्दल कोहलीला हा सन्मान मिळाला. यावेळी विराट कोहलीचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा देखील मैदानावर उपस्थित होते. कोहलीने त्यांचे पाय स्पर्श करून आशीर्वाद घेतले.
100 कसोटी सामने खेळणारा विराट हा दिल्लीचा तिसरा क्रिकेटपटू आहे. त्याच्या आधी वीरेंद्र सेहवाग आणि इशांत शर्मा यांनी ही कामगिरी केली होती. जरी विराटने सुमारे 3 वर्षांपूर्वी मार्च 2022 मध्ये त्याचा 100 वा कसोटी सामना खेळला आणि त्यानंतर 2023 मध्ये त्याने दिल्लीत एक कसोटी सामनाही खेळला, परंतु नंतर डीडीसीए त्याचा सन्मान करायला विसरला. तरीही, डीडीसीएने आपली चूक सुधारली आणि माजी भारतीय कर्णधाराचा सन्मान केला. काही वर्षांपूर्वी, डीडीसीएने अरुण जेटली स्टेडियममधील एका पॅव्हेलियनला विराट कोहलीचे नाव देऊन भारतीय स्टार खेळाडूचा सन्मान केला होता.
किंग कोहलीची 'विराट' कारकीर्द ?
विराट कोहली सध्या कसोटीमध्या खराब फॉममधून जात आहे. पण त्याने त्याच्या 14 वर्षांच्या कारकिर्दीत अनेक गोष्टी साध्य केल्या आहेत. आतापर्यंत 123 कसोटी सामने खेळणाऱ्या कोहलीने 9230 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 30 शतकांचा समावेश आहे. या काळात कोहलीने 60 कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले आणि 40 कसोटी सामने जिंकून देशाचा सर्वात यशस्वी कर्णधार असल्याचे सिद्ध केले.
हे ही वाचा -