पालघर : गेल्या 12 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी (Ashok dhodi) यांचा शोध घेण्यात अखेर पालघर पोलिसांना यश आल आहे. गुजरात मधील भिलाड पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या सरिग्राम येथील एका बंद दगड खाणीच्या पाण्यात 40 फूट खोल अशोक धोडी यांचा मृतदेह आणि त्यांची लाल रंगाची ब्रीझा कार आढळून आली आहे. कौटुंबिक वाद आणि इतर वादातून त्यांच्या भावानेच आपल्या साथीदारांना सोबत घेऊन अशोक धोडी यांची हत्या केल्याचं यानंतर उघड झालंय. 20 जानेवारीपासून बेपत्ता असलेल्या अशोक धोडी यांचा शोध घेण्यात अखेर पालघर (Palghar) पोलिसांना बारा दिवसानंतर यश आल. मुंबईतून घरी परतत असताना अशोक धोडी यांच्या भावानेच त्यांचं अपहरण करून हत्या केल्याचं आता जवळपास निश्चित झालं. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपींनी थेट गुजरात गाठलं असून गुजरातच्या सरिग्राम येथील दगड खाणीत अशोक धोडी यांचा मृतदेह आणि गाडी थेट 40 फूट खोल पाण्यात ढकलली होती.
पालघर पोलिसांच्या तपासात आज तब्बल 12 दिवसानंतर अशोक धोडींसह त्यांच्या गाडीचा शोध घेण्यात यश आले आहे. तब्बल 7 तासांच्या अथक प्रयत्नानंतर पालघर पोलिसांनी अशोक धोडी यांचा मृतदेह गाडीसह बाहेर काढला. कौटुंबिक वाद आणि इतर वादातून अशोक धोडी यांचा लहान भाऊ अविनाश धोडी यांनीच आपल्या सहकारी आरोपींसह अशोक धोडी यांचं अपहरण करून त्यांची हत्या केल्याच आता उघड झाला आहे. आरोपी अविनाश धोडी याचा दारू तस्करीचा अवैध धंदा असून या धंद्यात अशोक धोडी अडचण ठरत असल्याने अविनाश धोडी यांनी अशोक धोडी यांच अपहरण करून हत्या केली. या प्रकरणात चार आरोपींना अटक केली असून मुख्य आरोपी अविनाश धोडी याच्यासह आणखीन तीन आरोपी फरार आहेत. या फरार आरोपींचा पालघर पोलीस सध्या शोध घेत आहेत. त्यांचाही लवकरच शोध घेऊन अटक केलं जाईल, असा विश्वास यावेळी पालघरच्या पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी धोडी कुटुंबाला दिला.
माझ्यासह गावातील नागरिकांना धोका
12 दिवसानंतर अशोक धोडी यांचा मृतदेह शोधण्यात पालघर पोलिसांना यश आल्याने अशोक धोडी यांचा मुलगा आकाश धोडी यांनी पोलीस प्रशासनाच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केल. मात्र, माझ्या वडिलांचा जीव गेला, त्याप्रमाणे आरोपींना देखील फाशीची शिक्षा द्यावी असं सांगतानाच त्यांनी आमच्या कुटुंबीयांनाही आरोपींपासून धोका असल्याची भीती व्यक्त केली. तसेच मुख्य आरोपी अविनाश धोडी याला लवकरात लवकर अटक करून त्याला कठोर शिक्षा करावी, अन्यथा आमच्या गावातील नागरिकांना देखील त्याच्यापासून धोका असल्याच आकाश यांनी म्हटलं.
फरार आरोपींची मोठी दहशत
दरम्यान, बेपत्ता अशोक धोडी यांचा शोध घेण्यात तब्बल 12 दिवसानंतर पालघर पोलिसांना यश आलं. मात्र अजूनही तीन ते चार आरोपी फरार आहेत. फरार आरोपींवर अनेक गुन्हे दाखल असून त्यांची तलासरीसह डहाणूत मोठी दहशत आहे. त्यामुळे, पालघर पोलिसांनी आता या आरोपींच्या कायमच्या मुसक्या आवळण्याची गरज निर्माण झाली आहे.