चांगल्या कॉलेजला प्रवेश मिळेल की नाही या चिंतेतून विद्यार्थ्याची आत्महत्या
अक्षय हा प्राथमिक शाळेपासूनच अभ्यासात अतिशय हुशार विद्यार्थी होता. त्याची डॉक्टर होण्याची इच्छा होती, असे त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी सांगितले. त्याच्या आत्महत्येमुळे देवकर कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यात चांगल्या गुणांनी दहावी पास होऊनही विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लातूरमधील शाहू कॉलेजला प्रवेश मिळेल की नाही या चिंतेतून या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचं समोर येत आहे. अक्षय शहाजी देवकर (16) असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचं नाव असून तो दहावीत 94.20 टक्के गुण मिळवून पास झाला होता. मात्र कॉलेज प्रवेशाच्या चिंतेतून त्याने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
दहावीच्या परीक्षेत 94.20 टक्के गुण मिळवल्याने अक्षय ग्रामस्थांच्या कौतुकास पात्र ठरला होता. अक्षयला गणितामध्ये 99 गुण मिळाले होते. चांगले गुण मिळाल्याने अक्षयला लातूर पॅर्टनमधल्या शाहू काॅलेजला प्रवेश हवा होता. तसेच अक्षयला शाहू काॅलेजमध्ये कदाचित प्रवेश मिळालाही असता. कारण शाहू काॅलेजच्या सगळ्या लिस्ट अद्याप लागल्या नाहीत. मात्र त्याआधीच अक्षयने आपलं जीवन संपवलं.
घरची परिस्थिती अत्यंत बेताची असताना देखील शहाजी देवकर आपल्या मुलाच्या उच्च शिक्षणासाठी धडपड करत होते. प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून अक्षयला त्यांनी लातूरच्या साने गुरूजी माध्यमिक विद्यालयात शिक्षणासाठी लातूर येथे ठेवले होते.
दहावीचा निकाल लागल्यापासूनच अक्षय हा निराश होता. त्याला लातूरच्या राजर्षी शाहू कॉलेजला प्रवेश घ्यायची इच्छा होती. यासाठी नाव नोंदणीही केल्याची माहिती आहे. परंतु, आपला प्रवेश होईल की नाही ही चिंता त्याला सतावत होती. मोठ्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला नाही तर शिष्यवृत्तीही मिळणार नाही, या नैराश्येतून त्याने गुरूवारी दुपारी राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. चांगले गुण मिळाले म्हणून ग्रामस्थांनी त्याचा सत्कार केला, त्यावेळीही शाहू कॉलेजला नंबर लागल्यानंतर सत्कार करा, तोपर्यंत नको, असं त्यानं बोलून दाखवलं होतं.
अक्षय हा प्राथमिक शाळेपासूनच अभ्यासात अतिशय हुशार विद्यार्थी होता. त्याची डॉक्टर होण्याची इच्छा होती. 94 टक्के गुण मिळुनही शाहू कॉलेज लातूर येथे नंबर लागतो की नाही आणि प्रवेश मिळाला नाही तर मॅनेजमेंट कोट्यातून पैसे भरायची आई-वडिलांची परिस्थिती नाही, याची चिंता अक्षयला होती.
या प्रकरणी दत्तात्रय देवकर यांनी दिलेल्या माहितीवरुन शिराढोण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.