माजी खासदार तुकाराम रेंगे यांची ऑनलाईन फसवणूक, सिम कार्ड ब्लॉक झाल्याचे सांगून खात्यातून 49 हजार रुपये लंपास
परभणीचे माजी खासदार तुकाराम रेंगे यांना मोबाईल सिम कार्ड ब्लॉक झाल्याचं सांगून ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. चोरट्यांनी बँक खात्यातून 49 हजार रुपये लंपास केले.

परभणी : इंटरनेटचे जाळे जेवढे विस्तारत जात आहे तेवढेच ऑनलाईन फसवणुकीचे प्रकारही वाढत आहेत. सिम कार्ड, एटीम कार्ड ब्लॉक झाले आहे, केवायसी करायचे आहे, आदी सांगून फोन वरूनच असंख्य नागरिकांना फसवले जात आहे. यात भर पडली आहे परभणीचे माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील यांची. तुकाराम रेंगे यांना मोबाईल सिम कार्ड ब्लॉक झाले आहे ते नियमित करण्यासाठी अॅप डाउनलोड करायला लावून 49 हजार रुपयांना गंडवल्याचे समोर आले. तुकाराम रेंगे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात इसमांविरोधात शहरातील ननल पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील यांच्या मोबाईलवर एक मेसेज आला होता. त्यात त्यांचे सिम कार्ड ब्लॉक झाल्याचं म्हटलं होतं. तो त्यांनी मेसेज त्यांच्या घरी काम करणाऱ्या सचिन काजळे, सोपान फाळके यांना दाखवला आणि सिम कार्ड सुरु करण्याबाबत त्या कंपनीच्या कार्यालयात पाठवले. मात्र रेंगे यांचा माणूस जेव्हा घरी पोहोचला तेव्हा त्यांना एक फोन आला. मी कंपनीमधून बोलत असल्याचं सांगितलं. "तुम्हाला सिम कार्ड चालू करण्यासाठी क्विक सपोर्ट हे अॅप डाऊनलोड करा. त्यातून दहा रुपयांचा रिचार्ज करा, असं या कॉलमध्ये सांगण्यात आलं. मात्र ते अॅप डाऊनलोड झाले नाही तेव्हा ते दुसऱ्या मोबाईलमध्ये करा, अस सांगण्यात आलं. तेव्हा रेंगे यांनी त्यांच्या घरी काम करणारे सोपान वाळके यांच्या मोबाईलमध्ये अॅप डाऊनलोड केलं आणि रिचार्ज करण्यासाठीही सोपान वाळके यांच्या डेबिट कार्डचा वापर केला. तेव्हा एक ओटीपी आला आणि सोपान याच्या खात्यातून 49 हजार रुपये डेबिट झाल्याचा एक मेसेज त्या मोबाईलवर आला, तेव्हा त्यांना कळले की आपली फसवणूक झाली आहे.
या प्रकारानंतर माजी खासदार तुकाराम रेंगे यांनी नानल पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईल धारकाविरोधात तक्रार दिली. त्यावरुन संबंधित इसमांविरोधात फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नानल पेठ पोलीस करत आहेत.























