सांगली, सोलापुरात कांद्याचे दर घसरले, बाजापेठांमध्ये तुर्की आणि इजिप्तचा कांदा दाखल
सांगली आणि सोलापुरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. शिवाय बाजारपेठांमध्ये तुर्की आणि इजिप्तचा कांदा दाखल झाला आहे. आवक जास्त दिसत असल्यामुळे स्थानिक कांद्यांचे दर घसरले आहेत. परिणामी शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
सोलापूर : सोलापूर आणि सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. दिवाळीनंतर राज्यात कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली होती. मात्र मागील काही दिवसांपासून दररोज कांद्याच्या दरात घसरण होताना पाहायला मिळत आहे. एकीकडे स्थानिक कांद्याच्या दरात घसरण होत आहे तर दुसरीकडे सांगली आणि सोलापूरच्या बाजारात तुर्की आणि इजिप्तचा कांदा देखील दाखल झाला आहे.
सोलापुरात मागील महिन्याभरात जवळपास तीन हजारांनी कांद्याचे दर घसरले आहेत. आज सोलापुरात चांगल्या दर्जाच्या कांद्याला जास्तीत जास्त 2600 रुपये प्रति क्विंटल भाव होता. तर तिकडे सांगलीच्या बाजारपेठात देखील सरासरी 30 ते 35 रुपये प्रति किलो भावाने कांदा विक्रीला गेला. सातत्याने कांद्याच्या दरात होणाऱ्या घसरणीमुळे शेतकऱ्यांमध्ये चांगलीच नाराजी पाहायला मिळत आहे.
सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत देखील इजिप्तवरुन आयात करण्यात आलेला जवळपास 10 टन कांदा बाजारात आला. स्थानिक कांद्याला उग्र वास आणि झणझणीत, तिखट चव असते. मात्र इजिप्तवरुन आयात करण्यात आलेल्या या कांद्याला तशी चव नाही. इजिप्तच्या कांद्याला काकडीप्रमाणे सपक चव आहे. त्यामुळे भारतीय बाजारपेठात या कांद्याला जास्त मागणी नाही. त्यामुळे केवळ 1500 ते 1700 रुपये इतकाच भाव सोलापुरातील बाजारपेठात या कांद्याला मिळाला. मात्र या कांद्यामुळे बाजारपेठात कांद्याची आवक जास्त दिसून येत आहे. त्यामुळे स्थानिक कांद्याच्या दरात देखील घसरण होत असल्याचे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.
सांगलीच्या विष्णू आण्णा फळ मार्केटमध्ये भारतीय कांद्याचे दर घसरले सांगलीच्या विष्णू आण्णा फळ मार्केटमध्ये तुर्की आणि इजिप्तचा कांदा दाखल झाला आहे. परदेशातील कांदा आयात केल्याने स्थानिक कांद्याचे दर घसरले आहेत. मात्र मार्केट डाऊन असल्याने व्यापारी हा कांदा विकत आहेत. इजिप्त आणि तुर्कीचा कांदा हा 22 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. या कांद्याला जास्त मागणी नसल्याने आणखी दर या कांद्याचे घसरत आहेत. तर स्थानिक कांदा हा 30 ते 35 रुपयांनी विकला जात आहे. स्थानिक कांद्याला याचा फटका बसला आहे. कारण या परदेशी कांद्याला चव नसल्याने हा कांदा शक्यतो हॉटेलमध्ये विकला जातो. त्यामुळे काही प्रमाणात का होईना या कांद्याची विक्री होत आहे. त्यामुळे हा कांदा आणल्याने कांद्याची आवक वाढली आहे आणि भारतीय कांद्याचे देखील दर घसरत आहेत. यामुळे शेतकरी या परदेशी कांद्याच्या विक्रीवर नाराज आहेत.