(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ajit Pawar : मी मोदींना बोललो होतो ते चंद्रकांत पाटलांना थेट झापलं; अजितदादांची लोकसभा निकालानंतर 'कबुली एक्स्प्रेस' सुसाट! आतापर्यंत कोणकोणती जाहीर कबुली दिली?
गेल्या काही दिवसांपासून जनसन्मान यात्रेतून अजित पवार जाहीरपणे लोकसभा निवडणुकीमध्ये कोणकोणत्या चुका झाल्या आणि त्यामधून आपण कसे काळजी घेत आहोत हे सातत्याने सांगण्याचा प्रयत्न करत आहेत.
Ajit Pawar : हो नाही अशी चर्चा सुरू असतानाच शरद पवारांच्या (Sharad Pawar) डोळ्यादेखत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) फोडून भाजपच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची राजकारणात प्रसिद्ध असलेली आक्रमक भाषा शैली गेल्या काही दिवसांपासून मवाळ झाली आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Election) अजित पवार गटाला दारूण पराभवाला सामोर जावे लागले. लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाकडून चार जागा लढवण्यात आल्या होत्या. मात्र, अवघ्या एका जागेवरती विजय मिळवता आला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आता कात टाकण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील महिलांना आकर्षित करण्यासाठी अजित पवार गटाकडून विशेष रणनीती आखली जात आहे. अजित पवार गट गुलाबीमय झाल्याचे चित्र आहे.
चुकलेल्या रणनीतीची सुद्धा कबुली देत आहेत का?
मात्र, हे सर्व होत असतानाच लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार आपल्या चुकलेल्या रणनीतीची सुद्धा कबुली देत आहेत का? असा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून जनसन्मान यात्रेतून अजित पवार जाहीरपणे लोकसभा निवडणुकीमध्ये कोणकोणत्या चुका झाल्या आणि त्यामधून आपण कसे काळजी घेत आहोत हे सातत्याने सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांची कबूल एक्स्प्रेस सुसाट असल्याचे दिसून येत आहे. विधानसभेच्या तोंडावर अजित पवार गटाकडून जनसन्मान यात्रा काढण्यात येत आहे. यात्रेमध्ये बोलताना सातत्याने अजित पवार लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या चुकांचा संदर्भ देत आहेत. यामध्ये त्यांनी कांदा निर्यातीवरून शेतकऱ्यांची माफी मागताना या संदर्भात पीएम मोदींशी बोललो होतो अशी प्रतिक्रिया दिली. संविधान, आरक्षण मुद्यावरूनही फटका बसल्याची कबुली अजित पवार यांनी दिली आहे. याच मुद्यावरून आता महायुतीकडून सातत्याने महाविकास आघाडीला प्रत्युत्तर दिलं जात आहे.
काय म्हणाले होते अजित पवार?
"पुणे शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेवेळी शरद पवार यांच्यावर बोलू नये अशी विनंती मी स्वतः केली होती. मात्र नेमकं त्याचवेळी नरेंद्र मोदींनी शरद पवारांचा (Sharad Pawar) उल्लेख 'भटकती आत्मा' असा केला. त्यामुळे निवडणुकीत मोठा फटका बसला", याची कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली. महाराष्ट्रातील जागा कमी का झाल्या याबाबत चर्चा करताना अजित पवार यांनी उपस्थितांना निवडणुकीचा प्रचारावेळीचा किस्सा सांगितला. ते नाशिकमध्ये बोलत होते. आता अजित पवारांनी पंतप्रधान मोदींनी (PM Modi) शरद पवारांचा भटकती आत्मा असा उल्लेख केल्यानं त्याचा फटका बसल्याचे वक्तव्य फेटाळले आहे. शरद पवारांवर बोलू नका अशी विनंती अजित पवारांनी मोदींना केल्याच्या चर्चांचा देखील त्यांनी इन्कार केला
कांदा उत्पादकांची माफी मागितली
अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी (Onion Farmers) सरकारच्या विरोधात मतदान केल्यानं पराभवाचा सामना करावा लागल्याची कबुली दिली. कांदा निर्यात आता बंद करायची नाही. लोकसभेला मोठा झटका दिला आमची कंबर मोडली, चूक झाली, माफ करा असे अजित पवार म्हणाले. अजित पवार म्हणाले की, शेतकऱ्यांनी पुढील वीज बिल भरायचे नाही, मागील थकलेलं बिल द्यायचे नाही. केंद्र सरकार आमच्या विचारांचे आहे. कांदा निर्यात आता बंद करायची नाही. लोकसभेमध्ये जो झटका दिला तो जोरात लागला. कंबर मोडली,आमची चूक झाली माफ करा. जो काम करतो तोच चुकतो कांदा निर्यात बंदी करायची नाही, वीज बिल माफ करा हे निर्णय दिले. दूध,कापूस, सोयाबीन, भात यासाठी योजना आणल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.
अजित पवार थेट चंद्रकांत पाटील यांच्यावर घसरले
लोकसभा निवडणुकीमध्ये बारामतीमध्ये मतदान झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच अजित पवार थेट चंद्रकांत पाटील यांच्यावर घसरले होते. त्यांनी चंद्रकांत पाटील यांची चांगलीच खरडपट्टी केली होती. त्यावेळी बारामतीमधील निकाल स्पष्ट झाला होता अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. बारामतीमध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात रिंगणात होत्या. मात्र सहानुभूतीच्या मुद्द्यावरून सातत्याने अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये कलगीतुरा रंगला होता. मात्र बारामतीला सुप्रिया सुळे यांनी दणदणीत विजय मिळवल्याने अजित पवार गटाला झटका बसला होता.
इतर महत्त्वाच्या बातम्या