नोंदणी आणि मुद्रांक विभागातील अधिकाऱ्यांचं एक दिवशी काम बंद आंदोलन, शासनाला लाखों रुपयांचा फटका
आज कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केल्यामुळे राज्यातील 500 हून अधिक रजिस्टर कार्यालय सुरु असूनही एकाही दस्ताची नोंद होऊ शकली नाही. त्यामुळे राज्य सरकारला दस्तनोंदणीतून मिळणारा लाखों रुपयांचा महसूल बुडाला.
मुंबई : राज्यभरातील नोंदणी आणि मुद्रांक विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आज आपल्या विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन केलं. याचा परिणाम राज्यातील बहुतेक ठिकाणी दस्तांची नोंदणी होऊ शकली नाही. यामुळे शासनाचा लाखों रुपयांचा महसूल बुडाला. जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहित तर आम्ही 4 ऑगस्टपासून बेमुदत संपावर जात असल्याची देखील घोषणा यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली. आंदोलकांनी सर्व कर्मचाऱ्यांना 50 लाखांचे जीवन विमा सुरक्षा कवच मिळावे, त्यांच्या विभागातील कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या 3 कर्मचाऱ्यांना भरपाई मिळावी, तातडीने रखडलेल्या बडत्या कर्मचाऱ्यांना देण्यात याव्या. तुकडेबंदी आणि रेरा कायद्यानव्य झालेल्या कारवाई त्वरित मागे घ्याव्यात अशा मागण्या आहेत.
याबाबत बोलताना राजपत्रित आणि अराजपत्रित अधिकारी आणि कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गजानन खोत म्हणाले की, नोंदणी आणि मुद्रांक विभाग अराजपत्रीत अधिकारी व कर्मचारी संघटना मागील दोन - तीन वर्षांपासून विविध मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा करत आहे. कोरोनाच्या काळात मुद्रांक विभागातील सर्व कर्मचारी हे शासनाचे 15 टक्के उपस्थितीचे बंधन असताना 100 टक्के उपस्थितीमध्ये काम करत आहेत. विभागातील कर्मचाऱ्यांनी मागणी करून सुध्दा जीवन सुरक्षा वीमा कवच लागू केलेले नाही. विभागामध्ये करोनामुळे तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यांना शासनाकडून कोणतीही भरपाई मिळालेली नाही. शासनाकडून दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये कोणत्याही सोयी -सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे सरकारचे मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना पन्नास लाखाचे विमा कवच मिळावे, तातडीने पदोन्नती कराव्यात, मुंबई शहरातील मुद्रांक जिल्हाधिकारीसारखी पदे खात्यातूनच भरावी, तुकडेबंदी आणि रेरा कायद्यान्वये झालेल्या कारवाई त्वरीत मागे घ्याव्यात, नोंदणी अधिकारी यांच्या विरोधात विनाकरण दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, यासह संघटनेकडून पंधरा मागण्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान आज कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केल्यामुळे राज्यातील 500 हून अधिक रजिस्टर कार्यालय सुरु असूनही एकाही दस्ताची नोंद होऊ शकली नाही. त्यामुळे राज्य सरकारला दस्तनोंदणीतून मिळणारा लाखों रुपयांचा महसूल बुडाला. जर आमच्या मागण्या आगामी काळात मान्य झाल्या नाहित तर आम्ही 4 ऑगस्ट पासून काम बंद आंदोलन करु असा इशारा आता संघटनेने दिला आहे.
संघटनेचे कार्याध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले की, सध्या कोरोना व्हायरसचे प्रमाण प्रचंड वाढत चालले आहे. अशाही परिस्थितीत आमच्या कर्मचाऱ्यांनी 100 टक्के उपस्थित लावून शासनाला महसूल मिळवून देण्यात हातभार लावला. परंतु या काळात आमच्या 3 कर्मचाऱ्यांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर आमच्या कर्मचाऱ्यांसाठी 50 लाखांचा विमा मंजुर करावा.
Thane Protest | ठाण्यात नोंदणी व मुद्रांक विभागातील कर्मचाऱ्यांचं एक दिवसीय लेखणीबंद आंदोलन