बर्थडेला तलवार घेऊन शायनिंग; इस्लामपूरच्या 'प्रिन्स दादा'ला बेड्या
इस्लामपूरमध्ये बेकायदा तलवार बाळगून हातात तलवार घेऊन वाढदिवस साजरा केला होता. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
सांगली : 'सैराट' सिनेमातील 'प्रिन्स दादा' त्याच्या हटके स्टाईलमुळे सर्वांना आठवणीत राहिला आहे. प्रिन्स दादाने सिनेमात वाढदिवशी तलवारीने केक कापल्याचा सीन अनेकांनी खऱ्या आयुष्यातही कृतीत आणण्याचा प्रयत्न केला. असाच एक प्रयत्न इस्लामपूरमधील एका महाशयांनी केला. या प्रकारामुळे त्यांना थेट तुरुंगाची हवा खावी लागली आहे.
इस्लामपूरमध्ये बेकायदा तलवार बाळगून, हातात तलवार घेऊन वाढदिवस साजरा केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. बिलाल मुबारक मणेर असं अटक केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.
सांगलीचे पोलीस उपअधीक्षक किशोर काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी बिलालने आपल्या मित्रासोबत स्वतःचा वाढदिवस साजरा केला होता. त्यावेळी त्याने स्वतःजवळ तलवार घेऊन वाढदिवस साजरा केला. तलवार हातात घेऊन त्याने फोटोसेशन केले आणि ते फोटो सोशल मीडियावर व्हायरलही केले.
सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो पाहिल्यानंतर पोलिसांनी बिलालचा शोध सुरू केला. त्यानंतर काल रात्री पोलिसांनी बिलालला अटक केली असून, त्याच्याकडे वाढदिवशी फोटो काढताना हातात घेतलेली तलवारही पोलिसांनी जप्त केली आहे.