New Year Celebration : नागपुरात 33 ठिकाणी नाकाबंदी; रात्री 12 वाजेपर्यंतच करा सेलिब्रेशन
शहरात यंदा 37 ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. लॉन, सोसायटी व इतर सार्वजनिक ठिकाणी रात्री बारापर्यंतच लाऊटस्पीकरला परवानगी देण्यात आली असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.
Nagpur News : कोरोनामुळे दोन वर्षांनंतर प्रथमच निर्बंधाशिवाय 'थर्टीफर्स्ट' निमित्त सेलिब्रेशनचे आयोजन होत असल्याने नागपूरकरांमध्ये (Nagpur Parties) प्रचंड उत्साह असताना, नागपूर पोलिसांनीही (Nagpur Police) बंदोबस्ताच्या दृष्टीने विशेष तयारी केली आहे. मद्यपानासाठी पहाटे पाच वाजेपर्यंत परवानगी असली, तरी लाऊडस्पीकरसाठी मात्र रात्री 12 वाजेपर्यंतचीच परवानगी देण्यात आली आहे.
आज सर्वत्र थर्टीफर्स्टच्या निमित्ताने उत्साह पाहायला मिळेल. त्याच पार्श्वभूमीवर शहरात अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात असणार आहे. पोलिसांनी जारी केलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय शहरात कायदा व सुव्यवस्था कायम रहावी तसेच तळीरामांवर नियंत्रण रहावे, यासाठी पोलिसांचाही तगडा बंदोबस्त असणार आहे. शहरालगतच्या निर्जनस्थळीही पोलिसांची वाहने पेट्रोलिंग करणार असल्याची माहिती आहे.
31 डिसेंबर रोजी रात्री नऊपासून शहरात जागोजागी बंदोबस्त राहणार आहे. पहाटेपर्यंत पोलिस जागोजागी नजर ठेवणार आहेत. शहरात 33 ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. याशिवाय शहरातील अठरा हॉटस्पॉवर अनुचित घटना होऊ नये, या दृष्टीने उपाययोजना करण्यात येत आहे. पोलिसांनी हद्दपारीतून परत आलेले 126 मक्काची शिक्षा भोगून परत आलेले 54 व एमपीडीएअंतर्गत शिक्षा भोगलेल्या 97 गुन्हेगारांचा आढावा घेतला आहे. नियमांचे उल्लंघन होत असेल, तर नागरिकांनी तत्काळ पोलिसांना संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस आयुक्तांनी केले आहे.
पहाटे पाच नव्हे रात्री 12 पर्यंतच परवानगी
शहरात यंदा अनेकठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. विविध आयोजकांकडून पोलिसांना 37 अर्ज प्राप्त झाले आहे. त्या सर्वांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र काही ठिकाणी आयोजकांनी पहाटे पाचपर्यंत लॉनमध्ये नाचगाणे चालेल, असे दावे केले आहेत. मात्र लॉन,सोसायटी व इतर सार्वजनिक ठिकाणी रात्री बारापर्यंतच लाऊडस्पीकरला परवानगी देण्यात आली आहे. 16 आयोजकांनी पोलिस परवानगी न घेताच आयोजन केले होते. त्यांना पोलिस आयुक्तांनी नियमानुसार परवानगी घेण्याची सूचना केली आहे. आयोजकांना पार्टीच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पोलिस यंत्रणा सज्ज...
- प्रत्येक पोलिस ठाण्याची दोन पेट्रोलिंग वाहने गस्तीवर
- शहरात आयोजित व्यावसायिक पार्टीवर विशेष नजर
- गरज पडल्यास शहरातील उड्डाणपुलावरील वाहतूक बंद करण्यात येईल
- फुटाळा, अंबाझरी परिसरात अतिरिक्त फौजफाटा तैनात असणार आहे
- शहरातील अठरा हॉटस्पॉटवर पोलिसांची करडी नजर असणार आहे
ही बातमी देखील वाचा...