कोरोना चाचणीच्या नावावर रुग्णाकडून 200 रुपयांची वसुली
नर्सकडून करण्यात आली पैशांची मागणी. गोंदिया मेडिकल कॉलेज मधील धक्कादायक प्रकार. सदर प्रकरणाची माहिती मिळताच....
गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयात विविध शस्त्रक्रियांकरता दाखल झालेल्या रुग्णांकडून कोरोना चाचणी करण्यासाठी रुग्णालयात सेवेत असणाऱ्या नर्सनं रुग्णाकडून पैसे मागत असल्याचा प्रकार समोर आला आहे. रुग्णालयातील रुग्णाकडून (Corona test) कोरोना चाचणीसाठी नर्स 200 रुपये मागत असल्याचा प्रकार रुग्णाच्या नातेवाईकांनी उघडकीस आणला. या संदर्भात वैद्यकीय अधिष्ठत्यांकडे तक्रारही दाखल करण्यात आली.
तक्रार दाखल करताच संबंधित स्टाफ नर्सची बदली दुसऱ्या कक्षात करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिष्ठात्यांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधताना दिली. गोरेगाव तालुक्याच्या बोरगाव येथील 26 वर्षीय दिनेश रहांगडाले या रुग्णाची कुटुंब शस्त्र क्रिया कुऱ्हाडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 31 डिसेंबरला करण्यात आली.
शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णाला त्याच्या स्वगावी सोडण्यात आले. मात्र रुग्णवाहिकेतुन उतरताच काही वेळातच त्या रुग्णाला मोठा रक्त स्त्राव सुरु झाला. त्यामुळं डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी गोंदिया येथील मेडिकल कॉलेज येथे जाण्याचा सल्ला दिला. तिथं गेलं असता रुग्णावर पुढील उचार करण्यासाठी येथील डॉक्टरांनी त्याला कोरोना चाचणीसाठी पाठवलं. मात्र कोरोना चाचणीसाठी येथील एका महिला कर्मचाऱ्यांनी चाचणीच्या नावावर 200 रुपये वसूल केले. हे प्रकरण वैद्यकीय अधिष्ठाता डॉ.नरेश तिरपुढे यांच्याकडे पोहचताच रितसर कारवाई करत सदर नर्सची बदली करण्यात आली. दरम्यान, यापूर्वीदेखील असाच प्रकार घडला असून, रुग्णाच्या नातेवाईकांकडून पैसे मागितले गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.