एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
निपाह व्हायरसचा राज्यात धोका नाही, पण काळजी घ्या!
आरोग्य विभागाने तातडीची बैठक घेऊन दक्षता घेण्यासंबंधित सूचना जारी केल्या आहेत. निपाह विषाणूचा संभाव्य धोका रोखण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने कंबर कसली आहे.
मुंबई/पुणे : केरळमध्ये थैमान घालणाऱ्या निपाह विषाणूचा कोणताही धोका महाराष्ट्राला नाही, असं राज्याच्या आरोग्य विभागाने म्हटलं आहे. आरोग्य विभागाने तातडीची बैठक घेऊन दक्षता घेण्यासंबंधित सूचना जारी केल्या आहेत.
भारतात निपाह व्हायरसच्या रुपाने नवं संकट समोर उभं राहिलं आहे. या व्हायरसची लागण झाल्याने केरळमध्ये आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जणांवर उपचार सुरु आहेत. चिंतेची बाब म्हणजे, या विषाणूवर कोणताही उपचार होत नाही.
दरम्यान, केंद्र सरकारने या प्रकरणाची तातडीने दखल घेतली आहे. यासाठी कालच केरळला डॉक्टरांचं पथक दाखल झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जेपी नड्डा यांनी दिली. मृतांच्या रक्ताचे नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत.
महाराष्ट्रात धोका नाही
निपाह विषाणूचा संभाव्य धोका रोखण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाची बैठक झाली, ज्यामध्ये दक्षता घेण्यासंबंधित चर्चा करण्यात आली.
निपाह विषाणू संसर्गजन्य असल्याने आजच्या बैठकीत राज्यातील सरकारी दवाखान्यांमध्ये आयसोलेशन वॉर्ड्स तयार ठेवणे, डॉक्टर्स आणि नर्सेसने मास्क आणि ग्लोव्हस सारखे प्रोटेक्टिव्ह गियर्स वापरून विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मुंबईत कस्तुरबा हॉस्पिटल मध्ये H1N1 साठी तयार असलेले आयसोलेशन वॉर्ड्स अशा रुग्णांसाठी वापरले जातील.
सुट्टीचे दिवस असल्याने महाराष्ट्रातून केरळात पर्यटनासाठी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अशा पर्यटकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. असे पर्यटक आढळल्यास त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्याची व्यवस्था करण्यात येईल.
आरोग्य विभागाकडून सूचना काढून do's & don't ची यादी जाहीर करण्यात येणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात निपाह विषाणूचा कुठलाही धोका नसून अजून एकही रुग्ण आढळला नसल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
निपाह व्हायरस कसा पसरतो?
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, निपाह व्हायरस (NiV) वेगाने पसरतो, जो मनुष्य आणि प्राण्यांमध्ये गंभीर आजाराला जन्म देतो.
NiV च्या बाबतीत सर्वात अगोदर 1998 साली मलेशियातील कम्पंग सुगाई निपाह येथून माहिती मिळाली होती. तेव्हापासूनच या व्हायरसला हे नाव देण्यात आलं.
त्यावेळी डुक्कर आणि वाटवाघूळपासून हा आजार पसरला जात होता.
मात्र नंतर ज्या ज्या ठिकाणी हा व्हायरस आढळून आला, तिथे हा व्हायरस पसरण्यामागचं कोणतंही नेमकं कारण आढळून आलं नाही. बांगलादेशमध्येही 2004 साली काही लोकांना या व्हायरसची लागण झाली होती.
बांगलादेशमधील या लोकांनी खजूरच्या झाडापासून मिळणारा द्रव पदार्थ खाल्ल्याचं समोर आलं होतं.
दरम्यान, या व्हायरसचा संसर्ग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला झाल्याची उदाहरणं भारतातही पाहायला मिळाली आहेत. NiV मुळे श्वसन प्रक्रियेसंबंधी गंभीर आजार होतो.
मनुष्य किंवा प्राण्यांना या आजारापासून दूर ठेवण्यासाठी आतापर्यंत कोणतीही लस तयार झालेली नाही.
निपाह विषाणूच्या संसर्गाची लक्षणे
निपाहची लक्षणं ही कुठल्याही मेंदूज्वरासारखी आहेत. सुरुवातीला ताप, अंगदुखी ही लक्षणं दिसतात. त्याचसोबत झोपाळलेपण किंवा मानसिक गोंधळलेपण (स्थळ काळाचं भान नसणं) हेही जाणवतं. त्यानंतर ती व्यक्ती कोमामध्ये जाते. अधीजन कालावधी (विषाणू शरीरात शिरल्यापासून ते लक्षणं दिसण्याचा कालावधी) हा 5 ते 14 दिवसांचा आहे.
निपाहवर कोणतंही खास औषध नाही. एक कुठलं ठराविक औषध दिलं तर निपाह बरा होतो असंही नाही. रिबॅफेरिन नावाचं औषध यावर वापरलं जातं. पण तेही हमखास गुणकारी औषध आहे असं नाही, अशी माहिती राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली.
काय काळजी घ्यावी?
वर सांगितलेली लक्षणं आढळल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी. मेंदूज्वर किंवा इतर आजारांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्यास निपाहची चाचणी करणं आवश्यक आहे. निपाहचा उद्रेक असलेल्या भागातून (बांगलादेश, केरळ, मलेशिया, बंगाल) जर प्रवास करुन आलेली व्यक्ती असेल आणि ही सगळी लक्षणं जाणवत असतील तर त्यांची अधिक बारकाईने तपासणी करणं गरजेचं आहे. याचसोबत खाली पडलेली फळं खाणं टाळलं पाहिजे. वैद्यकिय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी (नर्स, डॉक्टर) यांनी आपल्याला संसर्ग होणार नाही, याची काळजी घेणं गरजेचं आहे, अशी माहितीही डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली.
व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रीडा
निवडणूक
राजकारण
Advertisement