Yogendra Yadav : काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला समर्थन देण्याचं कारण काय? योगेंद्र यादवांनी स्पष्टच सांगितलं...
भारत जोडो यात्रेमुळे देशातील वातावरण बदलत आहे. सरसंघचालकांची (RSS Chief) मुस्लिम संघटनांसोबत बोलणी सुरू झाली आहे. हे या यात्रेचे फलित असल्याचे योगेंद्र यादव म्हणाले.
Nagpur News : देशातील सत्ताधीशांच्या शीर्ष नेतृत्वाने इंग्रजांप्रमाणेच 'तोडा आणि राज्य करा', ही भूमिका स्वीकारली आहे. लोकं, समाजात द्वेष पसरविला जात आहे. या 'फॅसिस्ट' वृत्तीला विरोध दर्शविण्यासाठी देशातील अनेक संघटना पक्ष आणि वैचारिक भेद बाजूला सारून काँग्रेसच्या (INC) भारत जोडो यात्रेला (Bharat Jodo Yatra) समर्थन देत आहेत. महाराष्ट्रातील 193 संघटना, पक्ष यात्रेत प्रत्यक्ष सहभाग नोंदविणार असल्याची माहिती स्वराज अभियानाचे योगेंद्र यादव (Yogendra Yadav) यांनी दिली. कोणताही पक्ष किंवा व्यक्तीला समर्थन नाही, तर देश आणि संविधान टिकविण्यासाठी काँग्रेसच्या अभियानाला हा पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील 193 संघटनांचा पाठिंबा
महाराष्ट्रातील विविध पक्ष, संस्था, संघटना आणि चळवळीच्या वतीने भारत जोडो यात्रेला समर्थन देण्यासंदर्भात नागपुरात तीन दिवसीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीत सहभागी सघटनांच्या प्रतिनिधींनी संयुक्त पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका विषद केली. राज्यातील विविध क्षेत्रातील 193 संघटनांनी पाठिंबा दर्शविला असून विदर्भातील 50-60 संघटना भारत जोडो यात्रेत प्रत्यक्ष सहभागी होणार आहे. लवकरच ही यात्रा देगलूरमार्गे महाराष्ट्रात दाखल होणार आहे. दक्षिणेकडे यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रात यात्रेची व्यापकता अधिकच वाढेल असा विश्वास यादव यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेला भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे मिलिंद रानडे, लोक संघर्ष समितीच्या प्रतिभा शिंदे, दक्षिणायनच्या अरुणा सबाने, स्त्रीवादी कार्यकर्त्या वर्षा देशपांडे, अदिवासी नेत्या कुसूम अलाम, मुजुमदार, शोकर सोनारकर, वारकरी संप्रदायाचे शामसुंदर सोन्नर उपस्थित होते.
सरसंघचालकांची मुस्लिमांसोबत चर्चा हे यात्रेचे फलित
भारत जोडो यात्रेमुळे देशातील वातावरण बदलत आहे. सरसंघचालकांची (RSS Chief) मुस्लीम संघटनांसोबत बोलणी सुरू झाली आहे. हे या यात्रेचे फलित आहे. पुढे आणखी बदल दिसून येतील. देशांतील मोठ्या संप्रदायांमध्ये वाद निर्माण करतात त्यापेक्षा मोठे देशद्रोही कोणीही नाही. आपल्या देशात रोज हिंदू-मुस्लिम वाद पसरविण्याचा प्रयत्न केला जातो. त्यांना देशविघातक ठरविले जावे, असे सांगत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.
16 दिवसांत 32 विषयांवर जागर
यात्रा नियोजित मार्गाने जाणार आहे. महाराष्ट्रात सुमारे 16 दिवस यात्रा राहणार आहे. पाठिंबा दर्शविणाऱ्या संघटनांकडून दररोज 2 याप्रमाणे 32 विषयांचा जागर केला जाणार आहे. यात्रेदरम्यान संबंधित विषयांवर खल होत असतानाच. पाठिंबा दर्शविणाऱ्या संघटनांकडून राज्यभरात या विषयांवर आधारित कार्यक्रम होईल. यानिमित्ताने ही यात्र राज्यभरात पोहोचविण्याचा प्रयत्न असल्याचे लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनी सांगितले.
इतर महत्त्वाच्या बातम्या