'स्वतःचे ठेवायचे झाकून अन् दुसऱ्याचे पाहायचे वाकून ही राऊतांची सवय'; नितेश राणेंचा घणाघात
Nitesh Rane : संजय राऊत यांनी पुन्हा एकदा आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. स्वतः चे ठेवायचे झाकून व दुसऱ्याचे पाहायचे वाकून ही संजय राऊत यांची सवय आहे, असा घणाघात नितेश राणे यांनी केला आहे.
Nitesh Rane on Sanjay Raut : आज सकाळी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. स्वतः चे ठेवायचे झाकून व दुसऱ्याचे पाहायचे वाकून ही संजय राऊत यांची सवय आहे, असा घणाघात भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला आहे.
नितेश राणे म्हणाले की, आज सकाळी बोलत असताना संजय राऊत यांनी पुन्हा एकदा आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) हे मुंबई दौऱ्यावर आहेत. पक्ष संघटन वाढविण्यासाठी बैठक सुरु आहे. लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) व भाजप बांधणीसाठी ते मार्गदर्शन करत आहेत. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. येत्या लोकसभा निवडणुकांमध्ये कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी जनसंपर्क कसा वाढवावा याबाबत मार्गदर्शन केले. तिथे उपस्थित होते त्यांना ते योग्य वाटले. याच्यावर बोलण्याचा अधिकार भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना आहे. पण स्वतः चे ठेवायचे झाकून व दुसऱ्याचे पाहायचे वाकून ही संजय राऊत यांची सवय आहे, असा टोला भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना लगावला आहे.
आदित्य ठाकरे रेंज रोवर वापरतात ती कुणाच्या मालकीची?
नितेश राणे पुढे म्हणाले की, महागड्या गाड्यांबाबत कोण बोलत आहे. संजय राऊत यांना आठवण करून देतो की, त्यांचे मालक व कुटुंब यांच्या सवयी आमच्यासारख्या २९ वर्षे त्यांच्या सोबत राहिलेल्या लोकांना माहिती आहे. मी पहिल्या दिवसापासून बोलतोय की, आमच्या नेत्यांवर बोलले तर तुमच्या मालकांचे वस्त्रहरण करणार आहे. तुमच्या गाड्या, जेवण, कपडे हे सर्व मला माहिती आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) कुटुंब हे मर्सिडीज व रेंज रोवरमधून फिरतात. त्या स्वतः च्या असतात का? आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे रेंज रोवर वापरतात ही कुणाच्या मालकीची आहे.
...अन्यथा मी सर्व खुलासा करेल
ठाकरेंच्या घरातील एसी व्हिडियोकॉन कंपनीचे आहे. ते पण वेणुगोपाल धूत यांकडून फुकट घेतले आहेत. ठाकरे वहिनींनी डायमंड लावलेले घड्याळ हे जुहूच्या कुठल्या शोरूम मधून घेतले, याचा खुलासा करावा, अन्यथा मी सर्व खुलासा करेल, असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.
मनी लॉन्ड्रिंगचे धागेदोरे नव्हे तर भुयारी गटार मातोश्रीपर्यंत पोहोचलेले
ईडी कारवाईवर नितेश राणे म्हणाले की, माजी खासदार अनिल देसाई (Anil Desai) हे स्वत: वहिनींना भाजी आणून देण्याचे काम करायचे. त्याचेच बक्षीस म्हणून त्यांना खासदार केले होते. ते एक कारकून आहेत. त्यामुळे ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला. त्यामध्ये देसाई यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांचाही हात आहे. याचे धागेदोरे नव्हे तर भुयारी गटार मातोश्रीपर्यंत पोहोचलेले आहेत, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
केसरकर मोठ्या मताधिक्याने निवडून येतात
दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांना निवृत्तीचा सल्ला देणारे बॅनर वेंगुर्ले तालुक्यात झळकले. याबाबत नितेश राणे म्हणाले की, दीपक केसरकर गेल्या तीन टर्मपासून सावंतवाडीमध्ये आमदार आहेत. मोठ्या मताधिक्याने ते सातत्याने निवडून येत आहेत. याआधीही काही लोकांनी, असे बॅनर लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा कुठलाही परिणाम त्यांच्यावर झाला नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.
आता सरकारने आरक्षण दिलंय
मनोज जरांगे हे मराठा आरक्षण (Maratha Reservation) ओबीसीमधूनच द्या या मागणीवर ठाम आहेत. यावर नितेश राणे यांना विचारले असता ते म्हणाले की, आता सरकारने आरक्षण दिले आहे. मुलं आता आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न करतील. समाजात भांडत बसणं योग्य नाही, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा