Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांच्या विरोधात आक्षेपार्ह कमेंट, बार्शीतल्या तरुणाला पोलिसांनी केली अटक
State Women Commission : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलेल्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना बार्शीतल्या तरुणांने आक्षेपार्ह पोस्ट केली होती.
सोलापूर: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांच्या विरोधात आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या तरुणाला बार्शी पोलिसांनी अटक केली आहे. युवराज ढगे असं आरोपी तरुणाचं नाव आहे. वटपौर्णिमेच्या निमित्ताने महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपली भूमिका मांडली होती. त्यामध्ये 'मी लग्न झाल्यापासून एकदाही वडाला फेरे मारले नाहीत. माझ्या नवऱ्यानेही कधी तसा हट्ट केला नाही.' अशी पोस्ट चाकणकरांनी शेअर केली होती. त्यांनतर रुपाली चाकणकर यांनी 'समाजाला सत्यावानाची सावित्री कळली. मात्र ज्योतिबांची सावित्री कळलीच नाही' असं वक्तव्य केलं होतं.
रुपाली चाकणकर यांचे हेच वक्तव्य फेसबुकवरील एका पेजने पोस्ट करीत त्यावर वाचकांच्या प्रतिक्रिया विचारल्या होत्या. यावेळी युवराज ढगे याने या पोस्टवर आक्षेपार्ह कमेंट केली. त्यामुळे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष सुवर्णा किशोर शिवपुरे यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. रुपाली चाकणकर या महिला आहेत हे माहित असताना देखील त्यांच्या मनाला लज्जा वाटेल अशा पद्धतीच्या कमेंट युवराज ढगे याने केली आहे. त्यामुळे त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी सुवर्णा शिवपुरे यांनी फिर्यादीतून केली होती.
या प्रकरणाची दखल घेत बार्शी शहर पोलिसांनी आरोपी तरुण युवराज ढगे याच्या विरोधात भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 509 आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम, 2000 च्या कलम 67 नुसार गुन्हा नोंद केला. गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपी युवराज ढगेला अटक देखील केली. ''फेसबुक किंवा कोणत्याही समाज माध्यमांचा वापर करताना जपून करावा. कोणत्याही पद्धतीच्या आक्षेपार्ह पोस्ट, कमेंट करु नये. विशेषत: महिलांच्या बाबतीत बोलताना खबरदारी घ्यावी.'' असे आवाहन बार्शी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामदास शेळके यांनी केले.
शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांचे रुपाली चाकणकरांना फेसबुकवरुन पत्र, कारवाईची मागणी
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी फेसबुक पोस्ट लिहल्यानंतर त्याखाली अनेक जणांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्यातील अनेक प्रतिक्रिया अश्लील आणि आक्षेपार्ह आहेत. अशा कमेंट करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी केलीय. कुलकर्णी यांनी फेसबुकवर पत्र लिहीत ही मागणी केलीय.
"मा.रुपाली चाकणकर, मीच तुमच्याकडे तुमच्यावरच्या अश्लील comment ची तक्रार करतो आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांची काल मी वटपौर्णिमेला वडाला जात नाही अशा प्रकारची एक भूमिका आली. त्यांच्या एका भाषणाच्या आधारे ती पोस्ट बनवली गेली. त्यात त्यांनी महिलांनी वटपौर्णिमेला जाऊ नये असे कुठेही म्हटलेले नाही फक्त मी स्वतः जात नाही हे सांगितले. यात खटकण्यासारखे काहीच नव्हते. मात्र फेसबुकवर त्यांच्या विरोधात अश्लील कमेंट केल्या जात आहेत. तेव्हा आता महिला आयोगाच्या अध्यक्षावरच नीच अश्लील comment बाबत मी त्यानाच पत्र लिहितो आहे. सोशल मीडियावर काल त्यांच्याबाबत जे घडले त्यावर त्यांनीच अध्यक्ष या नात्याने त्यांच्यातील स्त्रीबाबत सायबर सेलला कारवाई चे आदेश द्यावी अशी मागणी करणार आहे. त्याचबरोबर सायबर सेलने इथून पुढे कोणत्याही महिलांवर अशा comment केल्या तर सु मोटो कारवाई करावी असे आदेश त्यांनी देण्याची गरज आहे.'' असं मत हेरंब कुलकर्णी यांनी फेसबुकद्वारे व्यक्त केले आहे.