(Source: ECI/ABP News/ABP Majha)
देवेंद्र फडणवीस दोन नंबरला, हे सांगून त्यांचा अपमान नाही का? - सुप्रिया सुळे
Supriya Sule : मुख्यमंत्रिपदासाठी सर्वात लोकप्रिय नेता म्हणून एकनाथ शिंदे यांना पसंती असल्याचा दावा जाहिरातीमध्ये करण्यात आलाय.
Supriya Sule : देशामध्ये नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे सरकार... या जाहिरातीमुळे भाजप-शिवसेना यांच्यातील अंतर्गत कलह समोर आलाय. मुख्यमंत्रिपदासाठी सर्वात लोकप्रिय नेता म्हणून एकनाथ शिंदे यांना पसंती असल्याचा दावा जाहिरातीमध्ये करण्यात आलाय. श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातील स्थानिक भाजप नेत्यामधील कलह शांत होत नाही, तोपर्यंत नव्या चर्चा सुरु झाल्या आहेत. यावरुनच विरोधकांनीही निशाणा साधलाय. जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांनी जाहीर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस दोन नंबरला आहेत हे सांगून यांचा अपमान नाही का? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थिती केलाय.
देशामध्ये नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे सरकार... या जाहिरातीवर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, 'आज पेपर वाचून खूप आनंद झाला. महाविकास आघाडीचे सुगीचे दिवस आले आहेत, हे जे सत्तेत आहेत त्यांनीच कबूल केलं. 2024 मध्ये रयतेचे राज्य येत आहे. सरकारचे अपयश पहिल्या पांनावर आले आहे. स्वतः कमी मार्कने पास झाला आहेत, हे कबूल करणारा पक्षा आहे. त्यांनी आकडेवारी दिली आहे 53.6 लोकांनी यात त्यांना नाकारले आहे. देवेंद्र फडणवीस दोन नंबरला आहेत हे सांगून यांचा अपमान नाही का? 35 टक्के लागतात पास व्हायला हे ग्रेस मार्क घेऊन पास झाले आहेत. दोघांचे मिळून 46 टक्के होतात. लोकांनी यांना नाकारले आहे ते यांनी कबूल केलं आहे.'
...तर एकनाथ शिंदेंना नेतृत्व देऊन भाजपने त्यांच्या पक्षाला अधिक जागा द्याव्यात; जयंत पाटलांचा टोला
शिंदे आणि फडणवीस सरकारकडून एक सर्व्हे करण्यात आला होता. त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वाधिक पसंती असल्याची जाहिराती आज सगळीकडेच झळकल्या आहेत. यावरुन जयंत पाटील यांनी हा टोला लागावला. ते सांगलीमध्ये बोलत होते. शिंदे यांनी दिलेल्या जाहिरातीनंतर शिवसेना शिंदे गट आणि भाजपमधील धुसफूस समोर आल्याची चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजचा (13 जून) कोल्हापूर दौरा अचानक रद्द केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या सर्व्हेनुसार मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांना अधिक पसंती असेल, तर भाजपने त्यांचे ऐकावे आणि शिंदेंना भाजपने पूर्ण नेतृत्व द्यावं आणि त्यांच्या पक्षाने 70, 80, 90 जागा मागितल्या आहेत त्यांना तेवढ्या द्याव्यात, असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी लगावला.
जाहिरातमध्ये नेमकं काय आहे ?
राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे
अफाट प्रेम मिळते आहे जनतेचे
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जोडीने महाराष्ट्रात केलेल्या लोककल्याणकारी प्रकल्पांमुळे नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात त्यांना अव्वल स्थान मिळाले आहे.
मतदान सर्वेक्षणानुसार, भारतीय जनता पक्षाला 30.2 टक्के आणि शिवसेनेला 16.2 टक्के जनतेने दिला कौल म्हणजेच महाराष्ट्रातील 46.4 टक्के जनता भाजप आणि शिवसेनेच्या या युतीला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी इच्छुक आहे.
मुख्यमंत्रीपदाच्या सर्वेक्षणानुसार, एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रातील 26.1 टक्के जनतेला पुन्हा मुख्यमंत्रीपदी आणि देवेंद्र फडणवीस यांना 23.2 टक्के जनतेला मुख्यमंत्रीपदावर पाहायचे आहे. म्हणजेच, महाराष्ट्रातील 49.3 टक्के जनतेने पुन्हा या जोडीला पसंती दर्शविली. महाराष्ट्रातील जनतेचे खूप खूप आभार...