राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार डॉ. फौजिया खान यांना कोरोनाची लागण
खासदार फौजिया खान या त्यांच्या परभणीतील नांदखेडा रोड भागातील घरीच आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्या अथवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य कुठेही बाहेर निघाले नाहीत. मात्र त्यांना दोन दिवसांपासून काही लक्षणं दिसत असल्याने त्यांची रॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात आली.
परभणी : राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा राज्यसभा सदस्य डॉ. फौजिया खान यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मी कुठेही गेले नाही, सर्व काळजी घेतली. तरीही कसा संसर्ग झाला? हे माहिती नाही. माझी प्रकृती उत्तम असल्याने मी घरीच क्वॉरंटाईन होऊन उपचार घेणार असल्याची प्रतिक्रिया खान यांनी फोनवरून एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.
खासदार फौजिया खान या त्यांच्या परभणीतील नांदखेडा रोड भागातील घरीच आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्या अथवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य कुठेही बाहेर निघाले नाहीत. मात्र त्यांना दोन दिवसांपासून काही लक्षणं दिसत असल्याने त्यांची रॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात आली. त्यात त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने त्यांच्या घरासह स्थानिक परिसर प्रशासनाने सॅनिटाईज करून सील केला आहे. शिवाय त्यांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील सदस्य आणि इतर लोकांची तपासणी केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली. जिल्ह्यातील नेत्यांनाही आता कोरोनाची लागण झाल्याने प्रत्येकाने काळजी घ्यावी, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
नेमका संसर्ग कसा झाला माहिती नाही : डॉ. फौजिया खान
मी अथवा माझ्या कुटुंबातील एकही सदस्य कुठेही बाहेर निघालो नाही, तरीही हा संसर्ग झाला. बहुतेक बाहेरून घरी येणारा भाजीपाला अथवा इतर वस्तुंच्या माध्यमातून हा संसर्ग झाला असावा असा माझा अंदाज आहे. शिवाय माझी तब्येत अतिशय उत्तम आहे. त्यामुळे मी घरीच क्वॉरंटाईन होऊन उपचार घेणार असल्याची माहिती त्यांनी फोनवरून एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.
शपथविधीला जाणार नाही, पुढिल अधिवेशनात शपथ घेणार : डॉ. फौजिया खान
काही दिवसांपूर्वीच जाहीर झालेल्या राज्यसभा सदस्यांच्या नियुक्तीत राष्ट्रवादी काँग्रेस कडून फोजीया खान यांना संधी देण्यात आली आहे. त्याचा शपथविधी हा उद्या दिल्लीत होणार आहे. परंतु कोरोना झाल्याने आपण या शपथविधीला जाणार नसून पुढील अधिवेशनात शपथ घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
मुंबईच्या पालकमंत्र्यांना कोरोना, ठाकरे सरकारमधील अजून एक मंत्री पॉझिटिव्ह
कोरोनाचा राजकारण्यांनाही धसका, मंत्र्यांसह काही आमदार, महापौरांना लागण