Kolhapur : कोल्हापुरात शिंदे गटाकडून राष्ट्रवादीला पहिला हादरा बसण्याची शक्यता! पंचगंगा घाटावरून स्पष्ट संकेत
सिद्धगिरी मठ कणेरी यांच्याकडून कणेरी मठावर होत असलेल्या 'सुमंगलम' महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण कार्यक्रमात व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील सुद्धा उपस्थित होते.
Kolhapur : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज कोल्हापूरमध्ये पंचगंगा घाटावर पंचगंगेची आरती करण्यात आली. यावेळी कणेरी मठावर 20 ते 26 फेब्रुवारी दरम्यान होत असलेल्या 'सुमंगलम' महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमातून कोल्हापूर जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेसला पहिला हादरा बसण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
सिद्धगिरी मठ कणेरी यांच्याकडून कणेरी मठावर होत असलेल्या 'सुमंगलम' महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण कार्यक्रमात व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील सुद्धा उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून तळ्यात मळ्यात सुरु असलेल्या करवीरचे माजी शिवसेना आमदार चंद्रदीप नरके सुद्धा दिसून आले.नरके शिंदे गटात जाणार याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहे. मात्र, ए. वाय. पाटील व्यासपीठावरून दिसून आल्याने राजकीय भूवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादीत वेळोवेळी अपमान झाल्याची भूमिका पाटील यांनी बोलून दाखवली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा भावना बोलून दाखवली होती.
माजी आमदार के. पी. पाटील आणि ए वाय पाटील यांच्यातील राजकीय वाद टोकाला गेला आहे. दोघांमधील वाद मिटवण्यासाठी हसन मुश्रीफ यांनी प्रयत्न केले असले, तरी आजच्या ए. वाय. पाटील यांच्या शिंदे यांच्या व्यासपीठावरील उपस्थितीवरून त्यामध्ये यश आलेले नाही यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
तत्पूर्वी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज कोल्हापूरमध्ये पंचगंगा घाटावर पंचगंगेची आरती करण्यात आली. यावेळी कणेरी मठावर 20 ते 26 फेब्रुवारी दरम्यान होत असलेल्या 'सुमंगलम' महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. यावेळी कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसर राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर, कणेरी मठाचे मठाधिपती काडसिद्धेश्वर महाराज उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, तर प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
सुमारे 1350 वर्षांपेक्षा अधिक काळ अध्यात्मिक व सामाजिक परंपरा लाभलेल्या श्री सिद्धगिरी मठ कणेरी यांच्याकडून कणेरी मठावर 20 ते 26 फेब्रुवारी 2023 या कालावधीत आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'सुमंगलम' (sumangalam) महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पृथ्वी, पाणी, हवा, तेज, आकाश अशा पंचमहाभूतांवर (panch mahabhoot) आधारित भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. वैश्विक पर्यावरण संवर्धनासाठी हा महोत्सव होणार आहे.