उस्मानाबादेत राष्ट्रवादीचे नेते पद्मसिंह पाटील आणि राणा जगजितसिंह शिवस्वराज्य यात्रेला गैरहजर, तर्क-वितर्कांना उधाण
राणा जगजीत सिंह भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहे. मात्र भाजपच्या मोठ्या नेत्यांच्या उपस्थितीत आपला प्रवेश व्हावा, यासाठी ते आग्रही आहेत, अशी चर्चा आहे.
उस्मानाबाद : उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य आणि अजित पवारांचे सख्खे मेहुणे पद्मसिंह पाटील पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा आज उस्मानाबादमधील भूम-परांडा येथे दाखल झाली. मात्र शिवस्वराज्य यात्रेकडे पद्मसिंह पाटलांनी पाठ फिरवली आहे. तसेच राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आणि पद्मसिंह पाटलांचे पुत्र राणा जगजितसिंह हेसुद्धा शिवस्वराज्य यात्रेकडे फिरकले नाहीत. त्यामुळे पाटील पिता-पुत्र राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे.
गेल्या काही दिवसात पक्षातील अनेक मोठे नेते पक्ष सोडून जात असल्याने राष्ट्रवादीची आणि पवार कुटुंबियांची चिंता वाढली आहे. मात्र आता नातेवाईकही पक्ष सोडून जाण्याच्या तयारीत असल्याने हा पवार कुटुंबियांना मोठा धक्का मानला जात आहे.
राणा जगजीत सिंह भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहे. मात्र भाजपच्या मोठ्या नेत्यांच्या उपस्थितीत आपला प्रवेश व्हावा, यासाठी ते आग्रही आहेत, अशी चर्चा आहे. त्यातच येत्या काही दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा उस्मानाबादेत पोहोचणार आहे. त्याआधी पाटील पिता-पुत्र पुढील राजकीय वाटचालीबद्दल मोठा निर्णय घेऊ शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे.