(Source: ECI/ABP News/ABP Majha)
केंद्राच्या मदतीची किती काळ वाट पाहायची? शेतकऱ्यांना मदत देण्यात केंद्राचा सहभाग नसल्याचा खेद, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
केंद्र सरकारच्या मदतीची आणखी किती वेळ वाट पाहणार? असे म्हणत पूरग्रस्त शेतकऱ्याच्या मदतीवरुन आणि केंद्रीय पथकाच्या नुकसान पाहणी दौऱ्यावरून मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी उद्विग्न सवाल केला.
सांगली : केंद्र सरकारची वाट किती काळ पाहावी? पुराच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी देखील केंद्रीय पथक खूप उशीरा आलं. केंद्र सरकारच्या मदतीची आणखी किती वेळ वाट पाहणार? असे म्हणत पूरग्रस्त शेतकऱ्याच्या मदतीवरुन आणि केंद्रीय पथकाच्या नुकसान पाहणी दौऱ्यावरून जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केंद्राला उद्विग्न सवाल केला आहे. राज्य सरकारला जितकी मदत करणे शक्य आहे तितकी मदत सरकार करेल. महाराष्ट्र सरकार पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या मागे उभे राहतंय, पण केंद्र सरकारचा शेतकऱ्यांना मदत देण्यामध्ये आतापर्यंत कसलाही सहभाग नाही याचा आम्हाला खेद वाटतो असेही पाटील म्हणालेत.
जयंत पाटील म्हणाले की, महाराष्ट्रमधील वेगवेगळ्या भागांत तीन वेळा अतिवृष्टी झाली, पण केंद्र सरकारचं पथक नुकसान पाहणी करण्यासाठी खूप उशिरा आले. महाराष्ट्र मध्ये अनेक भागात संततधार पाऊस झाला आहे, मोठं नुकसान पिकांचे झालेय. आता शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे. राज्य सरकारकडून जी मदत शक्य आहे ती देण्याचा लवकरात लवकर प्रयत्न केला जाईल मात्र केंद्राने लवकर मदत देण्यासाठी हालचाल करावी अशी आम्हाला अपेक्षा आहे असेही पाटील म्हणालेत.
भाजपकडून राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बदनामीचं षडयंत्र
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या संबंधित संस्थांवर काल आयकर विभागानं धाड टाकल्याहे. यावर प्रतिक्रिया देताना मंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर तोफ डागली आहे. भाजपकडून राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बदनामीचं षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे. आयकर विभागाच्या धाडसत्रासंदर्भात बोलताना पाटील म्हणाले की, भाजप जे सुडाचे राजकारण करत आहे ते निषेधार्थ आहे, राजकारणासाठी घरातल्या व्यक्तींना त्रास देणे योग्य नाही, घरातल्या महिलांना-मुलांना त्रास देणे योग्य नाही. काही ईडीच्या केसेसमध्ये त्या व्यक्तीच्या आईला पत्नी जावयांना चौकशी करण्यासाठी बोलवण्यात आले. कारण नसताना अजितदादांच्या बहिणीच्या घरा धाडी टाकण्यात आल्या हे योग्य नाही असेही जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय.