Kokan Flood : तब्बल अडीच महिन्यानंतर केंद्राचं पथक कोकणच्या पुरग्रस्त पाहणी दौऱ्यावर
Kokan Flood : केंद्राचं पथक अडीच महिन्यानंतर येणार असल्यानं त्याचं फलित काय? पथकाला येण्याकरता इतका उशिर का झाला? यासारखे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
मुंबई : ऑगस्टमध्ये कोकणात मुसळधार पाऊस झाला. रत्नागिरी जिल्ह्यासह रायगड जिल्ह्यात देखील पावसानं हाहाकार उडवून दिला. रत्नागिरी जिल्ह्यातील जनजीवन देखील विस्कळीत झालं. न भूतो अशी पुरस्थिती यावेळी निर्माण झाली होती. करोडो रूपयांची हानी झाली. काहींनी आपले आप्त गमावले. संसार देखील पुराच्या पाण्यात गेला.
अडीच महिन्याच्या या कालावधीत बरंच पाणी गेलं. मोठ्या प्रमाणात सढळ हस्ते मदत केली गेली. प्रशासन, स्थानिक, काही संस्था, राजकीय पक्ष, नेते, काही संस्था मदत कार्यात स्वत:ला झोकून दिलं. अडीच महिन्याच्या या कालावधीत लोकं सावरत आहेत. पुर्वीप्रमाणे जीवन जगू लागली आहेत. सरकारकडून झालेल्या मदतीवर काही नाराजी देखील पाहायाला मिळत आहे. पण, त्यानंतर देखील सारं काही सुरळीत करण्याचे प्रयत्न प्रत्येक जण आपल्यापरिनं प्रयत्न करत आहेत. पण, आता तब्बल अडीच महिन्याच्या कालावधीनंतर केंद्राचं पथक पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहे.
येत्या मंगळवारी, 5 ऑक्टोबर रोजी हे पथक रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे. यावेळी खेडमधील पोसरे येथे भेट देत, पाहणी करत हे पथक चिपळूण येथे दाखल होईल. या ठिकाणी आढावा घेतल्यानंतर संध्याकाळपर्यंत हे पथक माघारी फिरणार आहे. त्यानंतर 6 ऑक्टोबर रोजी रायगड जिल्ह्यात देखील पथक पाहणी करणार असल्याची माहिती मिळत आहे.
दौऱ्याचं फलित काय?
तब्बल अडीच महिन्यानंतर केंद्राचं पथक पाहणी दौऱ्यावर येणार आहे. यावेळी दौऱ्याबाबत नाराजी असून काही सवाल देखील उपस्थित केले जात आहेत. पण, केंद्राचं पथक अडीच महिन्यानंतर येणार असल्यानं त्याचं फलित काय? पथकाला येण्याकरता इतका उशिर का झाला? पथकाकडून आता नेमकी केणत्या गोष्टीची पाहणी केली जाणार आहे? हा सारा प्रकार म्हणजे आमच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची प्रतिक्रिया पूरग्रस्तांमधून पुढे येत आहे. याबाबत प्रशासनासोबत बोलल्यानंतर त्यांनी पुढील काळात उपाययोजना करणे, आता आलेली परिस्थिती पुन्हा येऊ नये यासाठी उपाययोजना करणे गरजेचं असून त्या दृष्टीनं हा दौरा महत्त्वाचा असल्याचं म्हटलं आहे.
सध्या पूरग्रस्त भागात काय पाहणी?
पुरात घरांचं, दुकानांचं मोठं नुकसान झालं. सध्या पूरग्रस्त सावरत असून या भागातील जनजीवन देखील पूर्वपदावर आलं आहे. पण, दरड कोसळून नुकसान झालेल्या नागरिकांना मात्र आता प्रतिक्षा आहे ती पक्क्या घरांची!
महत्वाच्या बातम्या :
- ABP Majha Impact : निधी मंजूर होऊनही चिपळूण पूरग्रस्तांना मदत नाही, माझाच्या बातमीनंतर यंत्रणेला जाग, खात्यात पैसे आले!
- Corona Death : कोरोनामुळे मृत्यू झाल्यास 50 हजार नुकसान भरपाई मिळणार, केंद्राच्या प्रस्तावाला सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी
- Pandora Papers : परदेशात गुंतवणूक करणाऱ्यांचा तपशील असलेल्या पँडोरा पेपर्समध्ये सचिन तेंडुलकरचंही नाव?