UPA अध्यक्षपदाबाबतच्या चर्चांना शरद पवार यांच्याकडून पूर्णविराम
यूपीए अध्यक्षपदाबाबत सुरु असलेल्या चर्चांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पूर्णविराम दिला आहे. "यूपीएचा अध्यक्ष बनण्यात मला यत्किंचितही रस नाही," असं ते म्हणाले.
कोल्हापूर : "यूपीएचा अध्यक्ष बनण्यात मला यत्किंचितही रस नाही," असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यासंदर्भातील सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. यूपीएच्या अध्यक्षपदासाठी शरद पवार यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. तसा ठराव राष्ट्रवादी युवक काँग्रेसनेही केला आहे. तसंच संजय राऊत यांनी देखील 'सामना'तून यूपीए जीर्णोद्धाराचा सल्ला दिला होता. त्यावर शरद पवार यांनी कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत भाष्य करत पूर्णविराम दिला.
शरद पवार म्हणाले की, "मी यूपीए अध्यक्ष बनावं, असा ठराव आमच्या एका तरुणाने केला. मात्र मला यत्किंचितही त्यात रस नाही. मी त्यात पडणार नाही. मी जबाबदारीने घेणार नाही. पण एकत्र येऊन जर पर्याय देण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्यांना सहकार्य, सक्रिय पाठिंबा आणि मदत या सगळ्या दृष्टीने माझी तयारी आहे. याचा विचार मी करु शकतो. हे बघत असताना विरोधी पक्षांनी एकत्र यावं असं म्हणतात त्यावेळी काही वास्तव गोष्टीही दुर्लक्षित करुन चालणार नाहीत. वास्तव स्थिती ही आहे बाकीचे सगळे पक्ष, ममता बॅनर्जी यांचा पक्ष अतिशय शक्तिशाली पश्चिम बंगालमध्ये आहे. इतर पक्षांची राज्याराज्यांमध्ये शक्ती केंद्र आहेत. पण काँग्रेस एक असा पक्ष आहे जो देशाच्या प्रत्येत राज्यात कमी जास्त प्रमाणात आज आहे, भलेही सत्तेत नसेल, पण काँग्रेस कार्यकर्ता राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात, गावात बघायला मिळेल. त्यामुळे ज्या पक्षाचा बेस व्यापक आहे, त्या पक्षाला घेऊन पर्याय काही करायचा असेल तर ते करणं वास्तव्याला धरुन होईल. तसा विचार आमचे सहकारी करत असतील तर त्यातून काहीतरी निर्माण होण्याची शक्यता आहे."
काय म्हणाले होते संजय राऊत?
यूपीएचे अध्यक्ष आणि काँग्रसचे अध्यक्ष हे दोन वेगळे विषय आहेत. यूपीए ही कोणाची खासगी मालमत्ता नाही. सध्या यूपीए आहे की नाही अशी शंका येत आहे. आताच्या परिस्थितीत यूपीएचं नेतृत्व करायचे असेल तर त्यासाठी काँग्रेसने पुढाकार घ्यायला हवा. परंतु, काँग्रेस याबाबत पुढाकार घ्यायला तयार नाही. 2024 ची तयारी करायची असेल तर यूपीए मजबूत करावीच लागेल. त्यासाठी यूपीएच्या सातबाऱ्यावर अनेक नावे टाकावीच लागतील. काँग्रेसने यूपीएच्या जिर्णोधाराची तयारी करायला हवी, असे संजय राऊत म्हणाले होते.
अशोक चव्हाणांचा शिवसेनेला खोचक सल्ला
यूपीएचा सदस्य नसणार्यांनी यूपीएबद्दल बोलू नये, असा खोचक टोला सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी शिवसेनेला लगावला आहे. "यूपीएचे अध्यक्ष आणि काँग्रसचे अध्यक्ष हे दोन वेगळे विषय आहेत. यूपीए ही कोणाची खासगी मालमत्ता नाही. सध्या यूपीए आहे की नाही अशी शंका येत असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. संजय राऊत यांच्या या वक्तव्यावरुन अशोक चव्हाण यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.
संबंधित बातम्या