Sharad Pawar : मुस्लिम कार्यकर्ता असला, तर दाऊदचा माणूस असं म्हटलं जातं; शरद पवारांचा हल्लाबोल
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी कार्यालयात नेले आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Sharad Pawar on Nawab malik ED Inquiry : सत्याची भूमिका मांडणाऱ्यांना त्रास देण्याचे काम सुरू आहे. जे जाहीरपणाने बोलतात त्यांच्याविरोधात यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. नवाब मलिक हे केंद्राच्या विरोधात सप्ष्टपणे भूमिका मांडतात, त्यामुळेचं अशा प्रकारे यंत्रणांचा वापर करुन कारवाई होत असल्याचे पवार यावेळी म्हणाले. मुस्लिम कार्यकर्ता असला, तर दाऊदचा माणूस असं म्हटलं जातं असेही पवार यांनी सांगितले. सत्तेचा गैरवापर करुन लोकांना त्रास देणे, बदनाम करण्याचे काम सुरू असल्याचे पवार म्हणाले. दरम्यान, मी मुख्यमंत्री असताना देखील माझ्यावरही असेच आरोप केले जात होते असेही पवार यावेळी म्हणाले.
सद्या यंत्रणांचा गैरवापर केला जातो त्याचं हे उदाहरण आहे. नवाब मलिक जाहीरपणे बोलातात त्यांना असा त्रास दिला जाईल याची आम्हाला खात्री होती. त्यामुळे अधिक भाष्य करायची गरज नसल्याचे पवार यांनी सांगितले. पुरावे कशाचे? कसली केस काढली त्यांनी? एक साधी गोष्ट आहे, काही झालं आणि विशेषत: मुस्लिम कार्यकर्ता असला, तर दाऊदचा माणूस असं म्हटलं जातं. कोण काय, कुठं काय माहिती नाही. देशात हे सुरु आहे. हे काही नवीन नाही. मी मुख्यमंत्री होतो, त्यावेळी माझ्यावरही असाच आरोप होता. त्यावेळीही असं वातावरण तयार केलं होतं. 25 वर्ष झाली. केंद्र सरकार किंवा एजन्सीबद्दल जे बोलतात त्यांना यंत्रणांचा गैरवापर करुन त्रास दिला जातोय, असा हल्लाबोल शरद पवार यांनी केला. संजय राऊत काय म्हणाले त्याची मला कल्पना नाही, मी त्याच्यावर भाष्य करण्याचं कारण नाही असेही पवार म्हणाले.
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी अधिकाऱ्यांनी नेल्याची माहिती समोर आली आहे. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास नवाब मलिक यांनी ईडी कार्यालयात नेण्यात आले असल्याचे वृत्त आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची संपत्ती खरेदी केल्याप्रकरणात ईडी आणि इतर तपास यंत्रणांकडून कारवाई सुरू आहे. राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना चौकशीसाठी ईडीने समन्स पाठवले होते. ईडी अधिकाऱ्यांचे एक पथक आज सकाळी पाच वाजताच नवाब मलिक यांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्यानंतर जवळपास दोन तास चर्चा सुरू होती. त्यानंतर सकाळी सात वाजता नवाब मलिक यांनी स्वत: हून ईडी कार्यालयात चौकशीसाठी येत असल्याचे सांगितले आणि त्यानंतर ते ईडी अधिकाऱ्यांसोबत कार्यालयात दाखल झाले आहेत. तब्बल गेल्या 3 तासांपासून नवाब मलिक यांची चौकशी सुरू आहे.
प्रकरण काय?
मुंबईत आणि लगतच्या परिसरात ईडीनं काही दिवसांपूर्वी छापेमारी केली होती. ईडीच्या रडारवर डॉन दाऊद इब्राहीमची मुंबईतली मालमत्ता आणि त्या संपत्तीशी निगडीत व्यवहार करणारे काही नेतेमंडळी ईडीच्या रडारवर होते. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर ईडीने ही कारवाई सुरू केली. या छापेमारीनंतर काही नेते अडचणीत येऊ शकतात याची दबक्या आवाजात चर्चा सुरु होती.