वर्गणीचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण, नाशिकच्या मालेगावमध्ये गणेश विसर्जनला गालबोट, तणावाचे वातावरण
नाशिक जिल्ह्यातही मोठ्या उत्साहात गणेश विसर्जन सुरु आहे. दरम्यान, नाशिकच्या मालेगावमध्ये गणेश विसर्जनला गालबोट लागलं आहे.
Nashik : गेल्या दहा दिवसांपासून भक्ती, श्रद्धा आणि उत्साहात साजरा झालेल्या गणेशोत्सवाचा (Ganeshotsav 2025) समारोप आज (शनिवार, 6 सप्टेंबर) होत आहे. पारंपरिक वाद्यांच्या गजरात, ढोल-ताशांच्या ठेक्यावर आणि गुलालाच्या उधळणीत गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येनं लोक बाहेर पडले आहेत. नाशिक जिल्ह्यातही मोठ्या उत्साहात गणेश विसर्जन सुरु आहे. दरम्यान, नाशिकच्या मालेगावमध्ये गणेश विसर्जनला गालबोट लागलं आहे. फाडलेल्या वर्गणी पावतीचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या मंडळाच्या सदस्याला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे.
मालेगावमधील संगमेश्वर येथील परमात्मा गणेश मंडळाने विसर्जन थांबवले
मालेगावच्या गणेश विसर्जनला गालबोट लागलं आहे. मालेगावमधील संगमेश्वर येथील परमात्मा गणेश मंडळाने विसर्जन थांबवले आहे. गणपती बसण्याच्या दोन दिवस अगोदर फाडलेल्या वर्गणी पावतीचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या मंडळाच्या सदस्याला मारहाण करण्यात आली आहे. सामान्य रुग्णालयात उपचार घेत असतांना पुन्हा मारहाण झाली आहे. परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. अप्पर पोलीस अधिक्षकांसह पोलिसांकडून घटनेची दाखल घेण्यात आली आहे.
.
आज अनंत चतुर्दशीनिमित्त राज्यभरात दहा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन झाले आहे. काही ठिकाणी आणखी मिरवणुका चालूच आहेत. विसर्जनाला पावसाचीही हजेरी लागल्याचे राज्यातील काही भागांमध्ये दिसत आहे. मुंबईत आज सकाळपासूनच संततधार पाऊस सुरू आहे. विसर्जन निर्विघ्न पार पडावे, यासाठी पोलीस प्रशासन, महानगरपालिका, आपत्ती व्यवस्थापन आणि इतर यंत्रणा सज्ज आहे.
अकोल्यात गणेश भक्तांच्या वाहनावर काळाचा घाला
अकोल्यातून (Akola) एक दुःखद बातमी समोर येत आहे. गणेश विसर्जन करुन परत येणाऱ्या गणेश भक्तांच्या वाहनाचा अपघात झाला आहे. अकोल्यातील पातूर-अकोला रस्त्यावर ही घटना घडली आहे. या अपघातात एका तरुणाचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मृत झालेला तरुण आणि जखमी झालेले सर्वजण अकोल्यातील शिवसेना वसाहत भागातील रहिवासी आहेत. जय बजरंग गणेश उत्सव मंडळाच्या गणरायाच कापशी तलावावरुन गणेश विसर्जन करुन परतीच्या प्रवासात असताना हा अपघात झाला आहे. मृत आणि जखमी असे चौघे जण एकाच दुचाकीवर जात असताना त्यांच्या दुचाकीला कारने जबर धडक दिली आहे. त्यामुळं हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात अक्षरशः दुचाकीचा चूराडा झाला आहे. तर कारच देखील मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान रामचरण अंधारे असं अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव. तर राहुल खोंड, विनोद डांगे, विकी माळी हे गंभीर असून यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.























