कोथिंबीर 'भाव' खातेय! भाज्यांचे दर कडाडले; शेतकऱ्यांना फायदा मात्र सामान्यांचं बजट गडबडलं
vegetables rates hike : नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी भाजीपाला दर मात्र चढेच आहेत. अशातच सर्वच भाज्यांत वापरल्या जाणाऱ्या कोथिंबीर जुडीने उच्चांक गाठला आहे.
Nashik News : सर्वच भाज्यांत वापरली जाणारी कोथिंबीर सध्या नाशिकमध्ये (Nashik) 'भाव' खात असून सोन्याच्या भावाने विकली जात आहे. कोथिंबिरीचा दर गगनाला भिडला असून कोथिंबीर जुडी थेट 200 रुपयांना विकली जात आहे. नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी भाजीपाला दर मात्र चढेच आहेत. अशातच सर्वच भाज्यांत ( vegetables rates hike) वापरल्या जाणाऱ्या कोथिंबीर जुडीने उच्चांक गाठला आहे. ऐन सणाच्या काळात कोथिंबिरीचा भाव वाढला आहे.
आवक कमी झाल्याने नाशिकमध्ये सध्या कोथिंबिरीला चांगला भाव मिळत आहे. जवळपास 160 रुपये जुडी एवढा भाव व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्याला मिळत असून बाजारात 200 रुपयांनी कोथिंबीर जुडीची विक्री होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा होत असून सर्वसामान्यांनी मात्र तोंडात बोटे घातली आहेत.
नाशिक शहरासह पावसाने उघडीप दिली असली तरी अनेक भागात पावसाने भाजीपाल्याची अवस्था खराब केली आहे. यामुळे अद्यापही शेतमालाची आवक देखील बाधित झाली आहे. नियमित होत असेल्या आवकेच्या तुलनेत अवघी 50 ते 60 टक्के आवक सध्या सुरू असल्याने भाजीपाल्याचे दर कडाडलेलेच आहेत. पालेभाज्या तर मिळेनाशा झाल्या आहेत. ज्या थोड्याफार पालेभाज्या उपलब्ध होत आहेत. त्यांचे दरही जास्त असल्याचे चित्र आहे.
शेतकरी बांधवांकडील भाजीपाला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल होत असतो. तेथून विक्रेत्यांकडून भाजीपाला खरेदी करत किरकोळ बाजारात विक्री केली जाते. नियमित आवकेच्या सुमारे 50 ते 60 टक्केच आवक सध्या होत आहे. त्यामुळे कोणत्याही भाजीचे दर 20 किंवा 30 रुपये पावशेरपासून सुरु होऊन 120 ते 160 रुपये किलोपर्यंत जात आहेत. दरम्यान बाजारात भेंडी, शिमला, गिलके, दोडके, बटाटे, वांगी अशा नेहमीच्या भाज्या आवाक्याबाहेर दिसत असल्याने मुलांच्या डब्यात काय द्यायचे असा प्रश्न गृहिणींना सतावत आहे.
भाजी विक्रेते अमोल म्हणाले कि, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत शहरी भागालगतच्या मखमलाबाद, म्हसरूळ, आडगाव यासह पेठ, सुरगाणा, सिन्नर, निफाड इतर भागांतून भाजीपाला दाखल होतो. नाशिक शहरासह मुंबई आणि गुजरातमध्ये येथून भाजीपाला पाठवला जातो. गेल्या तीन-चार दिवसांपासून कोथिंबीर आवक घटल्याने कोथिंबीर जुडीला सोन्याचा भाव मिळत आहे. त्याचबरोबर इतर भाजीपाला दर देखील वाढले आहेत. पितृपक्षात भाजीपाला आवक कमी होती म्हणून भाव वाढले होते. आता मात्र सगळाच भाजीपाला महाग झाल्याचे त्यांनी सांगितले.
असे आहेत नाशिकमधील भाज्यांचे दर
अद्रक 80 रुपये किलो
लवंगी मिरची 100 किलो
शेवगा 70 रुपये किलो
ढेमस् 60 रुपये किलो
काकडी 550 रुपये कॅरेट
टोमॅटो 1100 रुपये कॅरेट
कोबी 200 रुपये कॅरेट
कोथिंबीर 200 रुपये जुडी
कारले 50 रुपये किलो
भोपळा 300 रुपये कॅरेट
फ्लॉवर 150 रुपये कॅरेट