Nashik News : नाशिकमध्ये टोळक्यांची दहशत, समाज कंटकांकडून वाहनांची तोडफोड, संशयित पोलिसांच्या ताब्यात
Nashik Crime : नाशिक (Nashik) शहरातील सिडको परिसरात गाड्यांची तोडफोड केल्याची घटना समोर आल्याने परिसरात दहशत पसरली आहे.
नाशिक : नाशिक (Nashik) शहरातील सिडको परिसरात गुंडाचा हैदोस सुरूच असून गुरुवारी खुनाची (Murder) घटना घडली. याबरोबर मागील पंधरा दिवसांत चार खुनाच्या घटना समोर आल्या. या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी तातडीने पावलं उचलत सिडको भागात गस्तीपथकच तैनात करण्यात आले. मात्र हे सर्व सुरु असतानाच काल रात्री उशिरा काही गुंडानी याच भागातील गाड्यांची तोडफोड केल्याची घटना समोर आल्याने परिसरात दहशत पसरली आहे. ही सगळी घटना परिसरात असलेल्या सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कैद झाली आहे.
नाशिक शहरातील (Nashik) गुन्हेगारी काही कमी होण्याचे नाव घेत नसून दोनच दिवसांपूर्वी भाईगिरीच्या वादातून एकाला संपविण्यात आल्याची घटना घडली. इन्स्टाग्रामवरील रिल्सच्या चढाओढीतून हा खून झाल्याचे पोलीस तपासात समोर आले. ही घटना सिडको परिसरात घडली. याच परिसरात मागील काही दिवसांपासून सातत्याने खून, हाणामारीच्या घटना समोर येत असून या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस (Nashik Police) यंत्रणा सतर्क झाली आहे. सिडकोतील गुन्हेगारी रोखण्यासाठी एकीकडे पोलीस आयुक्तांनी 25 पोलिसांचे गुंड विरोधी पथक सिडकोत तैनात केले. या पथकाने सिडकोतील रस्त्यावरून शुक्रवारी सायंकाळनंतर रात्रीपर्यंत गस्त घातली. त्या परिसराच्या जवळच गुंडांनी तब्बल 15 वाहनांची तोडफोड करत पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकाला आव्हानच दिले.
दरम्यान, या घटनेमुळे छत्रपती शिवाजी महाराज चौक (Nashik Crime) परिसरात नागरिकांमध्ये भीती पसरली असून सिडकोतील छत्रपती शिवाजी महाराज चौक, अचानक चौक, साईबाबा मंदिराच्या मागील बाजूला गुंडांनी दहशत माजवत वाहनांवर दगडफेक करत काचा फोडण्याची घटना समोर आली आहे. अंबड पोलीस ठाण्याच्या आधीच पंधरा दिवसांत चार खुनाच्या घटनांनी सिडको, अंबड, चुंचाळे परिसर हादरला आहे. या गुन्ह्यांच्या मालिकेने नाशिककरांमध्ये भीती पसरली आहे. तसेच पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले जात असल्याने आता पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी तातडीने गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी 25 स्वतंत्र पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे गुंडविरोधी पथक सिडकोत नियुक्त केले आहे.
सिडकोत गुंडविरोधी पथक तैनात...
सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांना देखील अंबड पोलीस ठाण्याच्या (Ambad Police Station) आवरातच तळ ठोकण्याची आणि त्यांचे कार्यालय शरणपूररोड येथून अंबडला चालवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सिडको शिवाजी चौकात भर दिवसा गुरुवारी संदीप आठवले या तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर पोलीस यंत्रणा अॅक्टिव्ह मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र काल रात्री उशिरा अकरा ते साडे अकरा वाजेच्या सुमारास तीन ते चार गुंडांनी परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. यात तीन ते चार कारच्या काचा फोडण्यात आल्या. तर दुचाकी रस्त्यात ढकलून त्याचीही तोडफोड करण्यात आली. काही नागरिकांनी या गुंडांना हटकण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही शिवीगाळ करण्यात आली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळतच तातडीने तपास सुरू करण्यात आला. याबाबत अंबड पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतल्याचे समजते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :