(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sudhir Tambe : नाशिक पदवीधर मतदारसंघातून अखेर सुधीर तांबेच, काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर
Sudhir Tambe : नाशिक (Nashik) पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसनं (Congress) सुधीर तांबेंना (Sudhir Tambe) उमेदवारी जाहीर केली आहे.
Sudhir Tambe : नाशिक पदवीधर मतदारसंघातून (Nashik Graduate Constituency) काँग्रेसनं (Congress) अखेर सुधीर तांबे यांना (Sudhir Tambe) उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसनं याबाबत एक पत्रक जाहीर केलं आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातून काँग्रेस कोणाला उमेदवारी जाहीर करणार याबाबत विविध चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. सुधीर तांबे यांचे पुत्र आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे डॉ. सत्यजीत तांबे यांनाही उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र, अखेर काँग्रेसकडून सुधीर तांबेंना उमेदवारी जाहीर केली आहे.
मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार
सुधीर तांबे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. ते मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरणार आहेत. बाळासाहेब थोरात आजारी असल्याने साध्या पद्धतीने भरणार अर्ज भरणार असल्याची माहिती त्यांनी दिली. थोरात मतदारसंघात परतल्यावर मोठा मेळावा घेऊन प्रचाराचा नारळ फोडणार असल्याचे सुधीर तांबे म्हणाले.
धनंजय जाधव भाजपकडून उमेदवारी अर्ज भरणार का?
नाशिक पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्या अनुषंगाने आपण नगर शहरांतील आणि मतदारसंघातील पदवीधर आणि कार्यकर्त्यांसोबत नाशिकला निघालो असल्याचे अहमदनगर येथील धनंजय जाधव यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले आहे. धनंजय जाधव हे भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत, त्यांनी काही दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातून उमेदवारीसाठी मागणी केली होती. त्यातच आज अर्ज भरण्याची शेवटचा दिवस असल्याने धनंजय जाधव यांचा उमेदवारी अर्ज भरणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. धनंजय जाधव हे वयाच्या 22 व्या वर्षांपासून राजकारणात आहेत. त्यांचे वडील कृष्णा जाधव हे अहमदनगरमधून आठ वेळा नगरसेवक राहिलेले आहेत. तर स्वतः धनंजय जाधव हे वयाच्या बावीसाव्या वर्षी पहिल्यांदाच नगरसेवक झाले होते. त्यांनी काँग्रेस दक्षिण जिल्हाध्यक्ष म्हणून देखील काम पाहिले आहे. ते पूर्वी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे निकटवर्तीय मानले जायचे. सध्या ते भाजप खासदार सुजय विखे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यांची पत्नी सुप्रिया जाधव या काँग्रेस पक्षाकडून अहमदनगर महापालिकेत विद्यमान नगरसेविका आहेत.
धनराज विसपुते हे देखील इच्छुक
नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी धुळ्याचे धनराज विसपुते हे देखील इच्छुक उमेदवार आहेत. विसपुते यांचे शिक्षण एम एस्सी, जीडीसी अँड ए झाले आहे. विसपुते यांचा व्यवसाय हा शेती असून अनेक शिक्षण संस्थांवर ते विश्वस्त पदावर आहेत. विसपुते यांची राजकीय कारकीर्द पहिली असता 2017 साली भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारणीवर त्यांची निवड झाली. धुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका निवडणुकीत आचारसंहिता प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. शासन सेवेतील इतर मागासवर्ग कर्मचारी आणि अधिकारी यांना पदोन्नती करिता जात वैधता पडताळणी आणि अट शिथिल करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांचे निकटवर्ती म्हणून धनराज विसपुते यांची ओळख आहे. तसेच आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन या पदावर धनराज विसपुते सध्या कार्यरत असून भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सहसंयोजकपदी देखील ते काम करीत आहेत. धनराज विसपुते यांना महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती वनश्री पुरस्कार, स्वच्छता दूत पुरस्कार पनवेल महानगरपालिका, ऊर्जा व संवर्धन पुरस्कार महाराष्ट्र राज्य मेढा, रायगड गौरव पुरस्कार, शिक्षण महर्षी पुरस्कार ग्राम कन्या पुणे 2013... यासह विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Nashik Election : नाशिक पदवीधरसाठी अद्याप भाजपचा उमेदवार नाही, 'या' नावांची होतेय चर्चा