(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nanded : भावपूर्ण श्रद्धांजलीचे व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवत प्रेमी युगुलाची विषारी औषध पिऊन आत्महत्या
घरच्यांचा लग्नाला विरोध असल्याने या प्रेमी युगुलांनी आत्महत्येचा मार्ग निवडला. नांदेड जिल्ह्यामध्ये हदगाव तालुक्यातील वडगाव येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे.
नांदेड : भावपूर्ण श्रद्धांजलीचा स्टेटस ठेवत प्रेमी युगलाने विष पिऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडलीय. हदगाव तालुक्यातील वडगाव येथील प्रेमीयुगुलाच्या लग्नाला दोघांच्या घरचा विरोध होत असल्याने विष प्राशन करून दोघांनीही आत्महत्या केलीय. या दुर्दैवी घटनेमुळे हदगाव तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सदरील घटना तामशा जवळील वडगाव शिवारात सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. आपल्या मोबाईलवर स्वत:च्याच भावपूर्ण श्रद्धांजलीचे स्टेट्स ठेवल्यामुळे या घटनेचा सुगावा लागलाय. तामसा पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, मयत तरुण शेषेकांत रामराव पाटील (वय 24) आणि तरुणी शिवानी केशव हरण (वय 22) असे प्रेमी युगलाची नावे आहेत. वडगाव शिवारात या दोघांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली आहे.
प्राथमिक माहितीनुसार प्रेमी युगुल हे एकाच गावातील असून एकाच समाजातील होते. विवाहाला घरचे मान्यता देणार नाहीत या भीतीपोटी त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा वडगाव परिसरात आहे. दरम्यान, सोमवारी सकाळी त्यांच्या मित्रांनी दोघांच्या मोबाईलवर ठेवलेले स्टेट्स बघून त्यांना फोन केले. परंतु फोनचे उत्तर मिळत नव्हते. त्यामुळे नातेवाईकांना फोन केल्यानंतर सदरील घटना उघडकीस आली आहे.
या प्रकरणी तामसा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आलीय. परंतु सदर घटनेची गुप्तता पाळण्याचा प्रयत्न तामसा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अशोक उजगरे यांच्याकडून केल्या जातोय. या घटनेविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता पोलीस उपनिरीक्षक अशोक उजगरे यांच्याकडून माहिती देण्यास साफ नकार देण्यात आलाय. तर अशा घटनांची माहिती माध्यमांना द्यावी अथवा न द्यावी हे पोलिसांच्या मनावरचा विषय असल्याचे ज्ञानही त्यांच्या कडून पाजळण्यात आलेय. त्यामुळे ही घटना लपवण्या मागे तामसा पोलिसांचा नेमका काय स्वार्थ आहे हेही पाहणे तितकेच महत्वाचे आहे.
महत्त्वाच्या बातम्या :