माळेगावात बेलभंडारा उधळत खंडोबा यात्रेचा पालखी सोहळा संपन्न, 20 हजार भाविकांनी घेतला दर्शनाचा लाभ
नांदेड जिल्ह्यातील माळेगावात बेलभंडारा उधळत श्री क्षेत्र खंडोबाचा पालखी सोहळा संपन्न झाला. या पालखी सोहळ्यात जवळपास 20 हजार भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.
नांदेड : नांदेड जिल्ह्यातील माळेगावात भरणारी श्री क्षेत्र खंडोबाची यात्रा ही दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा समजली जाते. यावर्षी कोरोनाच्या सावट असतानाही हा यात्रेचा सोहळा संपन्न झाला. माळेगावात बेलभंडारा उधळत श्री क्षेत्र खंडोबाचा पालखी सोहळा पार पडला. ओमायक्रॉनचे सावट असल्याने शासकीय पूजा करून हा सोहळा संपन्न झाला. कोरोनाच्या संकटामुळे सलग दोन वर्षापासून खंडोबा यात्रेचा पालखी सोहळा रद्द होत होता. यावेळी माळेगांव यात्रेतील या पालखी सोहळ्यात जवळपास 20 हजार भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. दरम्यान, ओमायक्रॉनच्या संकटामुळे यात्रेच्या ठिकाणी आरोग्य विभागाच्या वतीने कोरोना चाचणी देखील करण्यात आली.
कोरोना महामारीच्या सावटातच हा पालखी सोहळा संपन्न झाला. मात्र, या सोहळ्यासाठी जिल्हा परिषद, महसूल विभाग, पोलीस प्रशासन, देवस्थान, ग्रामपंचायत यांनी सहकार्य न केल्याचा आरोप यावेळी भाविकांनी व आरोग्य विभागाने केला आहे. जिल्हा प्रशासनाने यात्रेवर बंदी घातली असली तरी, पाळणे, स्लॅम्बो, ब्रेक डान्समुळे मात्र या यात्रेकडे नागरिकांनी गर्दी केली होती.
खंडोबा यात्रेच्या पालखी सोहळ्यात 10 टक्के लोकांनाही मास्क घातला नव्हता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी न घेतल्याचे दिसून आले. त्यामुळे संपूर्ण देशातून मार्गक्रमण करत यात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांमुळे कोरोनाचा शिरकाव होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. पालखी सोहळ्याच्या दिवशी माळेगावातील विद्युत पुरवठा मात्र दिवसभर बंद होता.
देशात पुन्हा एकदा कोरोना महामारीने चिंता वाढवली आहे. दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधित रुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. शनिवारी राज्यात 9 हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. यामध्ये मुंबईत आज 6 हजार 347 नवे रुग्ण आढळले आहे. पुणे जिल्ह्यात 631 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या चिंतेत वाढ झाली आहे. पण फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशातील इतर राज्यातही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे देशात कोरोनाची तिसरी लाट लवकरच येणार का? हा प्रश्न भेडसावत आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. अशातच पुन्हा राज्यात कडक निर्बंध लागण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- चिंता वाढवणारी आकडेवारी; महाराष्ट्रातच नव्हे, तर इतर राज्यातही वाढतोय कोरोना
- Mumbai Corona : मुख्यमंत्र्यांच्या आवाहनास शिवसैनिकांकडूनच हरताळ; मालवणी जत्रोत्सवात तुफान गर्दी, कोरोना नियमांची ऐशीतैशी