दोन प्रदेशाध्यक्ष एकाचवेळी कोराडी देवीच्या दर्शनाला; नाना पटोले, चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
Nana Patole and Chandrasekhar Bawankule : आम्ही राजकीय पक्ष म्हणून इथे आलो नाही, तर आईची मुलं म्हणून एकत्र आलो असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
Nana Patole and Chandrasekhar Bawankule : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज घटस्थापनेच्या निमित्ताने दोघेही एकाचवेळी कोराडीच्या देवीच्या मंदिरात एकत्रित आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचले. आम्ही राजकीय पक्ष म्हणून इथे आलो नाही, तर आईची मुलं म्हणून एकत्र आलो असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
आम्ही आईकडे विजयाचा आशीर्वाद मागितला
नाना पटोले म्हणाले की, कोराडी देवी आमचं कुलदैवत आहे. आम्ही दर नवरात्रीला येत असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही राजकीय पक्ष म्हणून इथे आलो नाही, तर आईची मुलं म्हणून एकत्र आलो असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही आईकडे विजयाचा आशिर्वाद मागितला. माझ्या नातीचा अन्नप्राशनाचा कार्यक्रम आम्ही इथेच आज केल्याचेही पटोले म्हणाले. आम्ही दोघे भाऊ आहोत, भावांसाठी आशीर्वाद मागितला असल्याचे ते म्हणाले. अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्यावरून पटोले यांनी खोचक प्रतिक्रिया दिली. परवा अमित शाह म्हणाले की, 2029 मध्ये स्वबळावर सत्ता आणायची आहे. म्हणजे 2024 मधे आम्ही आहोत, असे नाना पटोले म्हणाले.
कुठलीही राजकीय कटूता आज नाही
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, कोराडीच्या आईचा जन्म नाना पटोले यांच्या गावचा असल्याची आख्यायिका आहे. देवीकडे महाराष्ट्रात सुख संपन्न नांदू दे अशी प्रार्थना केल्याचे ते म्हणाले. कुठलीही राजकीय कटुता आज नाही, असेही त्यांनी सांगितले.
भंडारा-गोंदियातील 7 विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसने ठोकला दावा
दरम्यान, जागावाटपापूर्वी नाना पटोले यांनी दावा करत महाविकास आघाडीतील मित्रपक्षांना कोंडीत पकडले आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून भंडारा तर, राष्ट्रवादी काँग्रेसने तुमसर, भंडारा, अर्जुनी मोरगाव आणि तिरोडा या चार विधानसभेवर दावा केला आहे. नाना पटोले दोन्ही जिल्ह्यातील एकही जागा सोडायला तयार नसल्यानं महाविकास आघाडीतील शिवसेनेची मशाल आणि राष्ट्रवादीची तुतारी भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील दिसणार नाही, असं चित्र सध्या तरी दिसत आहे.
आगामी काळात महाविकास आघाडीचं काम करून उमेदवारांना विजयी करण्याचा सल्ला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीच त्यांच्या भंडाऱ्याच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे. गृह जिल्हा असलेल्या भंडारा आणि गोंदिया या दोन्ही जिल्ह्यातील सातही विधानसभा जागांवर दावा सांगून या जागा खेचून आणण्यासाठी पटोले यांनी शड्डू ठेकला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या