Nagpur : रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्यात आज बैठक, 'या' महत्वाच्या विषयावर होणार चर्चा
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यात आज बैठक होणार आहे.
Nagpur Winter Session : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यात आज बैठक होणार आहे. महापालिका निवडणुकीसंदर्भात दोन्ही प्रमुख नेत्यांमध्ये आज रात्री 9 वाजता बैठक होणार आहे. मुंबई, ठाण्यासह राज्यातील काही महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार याबाबत दोघांमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांच्या बैठकीत नवी मुंबई महानगर पालिकेबाबत काय चर्चा होणार याकडे लक्ष लागलं आहे. कालच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अमित शाह यांची भेट घेतली होती. अमित शाह यांच्या भेटीनंतर आज दोन्ही नेते एकत्र युती संदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापलं
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 2 डिसेंबर रोजी काही नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठीची मदतान प्रक्रिया पार पडली आहे. आणखी काही ठिकाणी 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर सर्व नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांचे निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर केले जाणार आहेत. दरम्यान, या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी महायुतीमध्ये ठिणगी पडल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. त्यामुळं महायुतीमधील अनेक नेत्यांनी ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप देखील केल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळं राजकीय वातावरण तापलं होतं. दरम्यान, आता पुढे राज्यात जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. अद्याप या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या नसल्या तरी हालचाली सुरु झाल्या आहेत. या निवडणुकांच्या अनुषंगाने आज रविंद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत मोठी घोषणा
दरम्यान, मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत मोठी घोषणा केली आहे. सेस आणि पागडी इमारतींच्या संदर्भात मोठी घोषणा केली आहे. भाडेकरुंच्या ताब्यात जेवढे क्षेत्र आहे तेवढाच एफएसआय भाडेकरुंना मिळणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. तर मालकाला भूखंड मालकीपोटी बेसिक एफएसआय देण्यात येणार आहे. त्यासाठी इन्सेटिव्ह एफएसआय दिला जाणार आहे. तिन्ही प्रकारचे एफएसआय देता येत नसेल तर उरलेला एफएसआय टीडीआर स्वरुपात देण्याचा विचार करणार असल्याची माहिती देकील एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.























