एक्स्प्लोर
मृत्यूवर मात करुन घवघवीत यश, दहावीत 97 टक्के गुण!
नागपुरातील एका विद्यार्थ्याने मृत्यूच्या दाढेतून बाहेर येत यश मिळवलं आहे. दहावीत 97.20 टक्के गुण मिळवणाऱ्या कौस्तुभ वैद्यची कहाणी प्रेरणादायी आहे.
नागपूर : जीवनात थोडंसं जरी संकट निर्माण झालं, तरी अपयशाचं खापर आपण त्याच्यावरच फोडतो. मात्र, नागपुरातील एका विद्यार्थ्याने मृत्यूच्या दाढेतून बाहेर येत यश मिळवलं आहे. दहावीत 97.20 टक्के गुण मिळवणाऱ्या कौस्तुभ वैद्यची कहाणी प्रेरणादायी आहे.
कौस्तुभ 30 मे 2017 रोजी घरातून निघून शेजारच्या दुकानात सामान खरेदीसाठी गेला. घरातून बाहेर पडताच एका भरधाव कारने त्याला उडवलं, ज्यामुळे तो लांब फेकला गेला. दहावीच्या वर्षात प्रवेश करणाऱ्या या अपघातात कौस्तुभ गंभीर जखमी झाला होता.
शाळेचंही सहकार्य
तब्बल दोन महिने तो खाटेवर झोपून होता. हळूहळू त्याने एकेक पाऊल चालणं सुरु केलं. अनेक महिने शाळा बुडाल्यानंतर तो कसातरी शाळेला जाऊ लागला. गंभीर अपघातातून सावरलेला कौस्तुभ पहिल्या माळ्यावरच्या त्याच्या वर्गात जाऊ शकत नव्हता. हे लक्षात येताच सोमलवार शाळेने त्याच्यासाठी वर्ग तळमजल्यावर आणले. जखमी कौस्तुभनेही चिकाटीने अभ्यास सुरु केला आणि दहावीत 97.20 टक्के गुण मिळवले.
इंजिनिअर बनण्याचं स्वप्न
भीषण अपघातानंतर वैद्य कुटुंबाला कौस्तुभ वाचेल की नाही, अशी शंका होती. त्याचा जीव वाचल्यानंतर कौस्तुभचे आई-वडिल देवाला धन्यवाद देत होते. जमेल तेवढ्या अभ्यासात कौस्तुभ उत्तीर्ण जरी झाला तरी चालेल, अशी त्यांची मानसिकता होती. मात्र, कौस्तुभचे गुण पाहून पालकांचा आनंद गगनाला भिडला आहे.
भविष्यात इंजिनिअर बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या कौस्तुभचा उत्साह आणि आत्मविश्वास आणखी वाढला आहे. मृत्यूच्या दाढेतून बाहेर पडत कौस्तुभने मिळवलेलं हे यश अनेकांना प्रेरणा देणारं आहे. कोणत्याही संकटावर आपण मात करु शकतो, हे त्याने सिद्ध केलं आहे.
कौस्तुभच्या यशस्वी वाटचालीसाठी एबीपी माझाकडूनही शुभेच्छा!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
Advertisement