(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नागपुरात पोलिसांच्या असंवेदनशीलतेचा कहर, जखमी वृद्धाला वेळेत रुग्णालयात न नेल्याने मृत्यू, चौघांचं निलंबन
Nagpur police : ज्येष्ठ नागरिकाच्या मृत्यूप्रकरणी निष्काळजीपणा दाखवल्या प्रकरणी नागपुरात एक पोलीस उपनिरक्षक आणि पोलीस तीन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.
नागपूर : ज्येष्ठ नागरिकाच्या मृत्यूप्रकरणी निष्काळजीपणा दाखवल्या प्रकरणी नागपुरात एक पोलीस उपनिरक्षक आणि पोलीस तीन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. निलंबित करण्यात आलेल्यामध्ये स्थानिक मानकापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक लाकडे, पोलीस कर्मचारी रोशन यादव आणि राहुल बोटरे यांच्यासह पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचारी संजय पांडे यांचा समावेश आहे.
माहितीनुसार नागपूरच्या लोखंडे नगर परिसरात राहणारे भैयालाल बैस हे 64 वर्षांचे वृद्ध 8 मार्च पासून त्यांच्या घरापासून बेपत्ता होते. ते बाहेर गेले असता 8 मार्चच्या संध्याकाळपर्यंत परतले नव्हते. 9 मार्चला सकाळी 10 वाजताच्या सुमारास भैय्यालाल बैस हे जखमी अवस्थेत गोरेवाडा भागात निर्जन ठिकाणी काही जणांना आढळले होते. त्याच वेळी तिथून जात असलेल्या पोलीस कर्मचारी संजय पांडे यांना लोकांनी माहिती दिली होती. संजय पांडे यांनी तिथे थांबून घटनेची माहिती स्थानिक मानकापूर पोलीस स्टेशनला दिली होती.
त्यानंतर संजय पांडे मानकापूर पोलीस स्टेशनचे पथक पोहोचण्याच्या आधीच तिथून निघून गेले होते. मानकापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक लाकडे आणि इतर दोन कर्मचारी दुपार पर्यंत घटनास्थळी पोहोचले नव्हते.जखमी भैयालाल संध्याकाळी 4 च्या सुमारास त्याच ठिकाणी मृतावस्थेत आढळले होते. नागरिकांनी वृद्धाचे मृतदेह पाहिल्यानंतर पोलिसांना सूचना दिली होती.
नंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेत पोस्टमार्टमसाठी पाठवले होते. भैयालाल यांच्या मृतदेहावर अनेक जखमा असल्याने वैद्यकीय रिपोर्टच्या आधारे 11 मार्च रोजी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला होता.
मात्र, आपल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने जखमी अवस्थेत वृद्ध आढळल्यानंतरही पोलीस पथक तिथे येईपर्यंत थांबणे योग्य समजले नाही आणि माहिती देऊनही मानकापूर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी वेळेत तिथे पोहोचले नाही आणि त्या वृद्धाचा मृत्यू झाल्यामुळे पोलीस आयुक्तांनी सर्व प्रकरण गांभीर्याने घेत प्राथमिक चौकशी केली आणि एक पोलीस उपनिरीक्षक आणि तीन पोलीस कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.
दरम्यान भैय्यालाल बैस यांची हत्या संपत्तीच्या वादातून झाल्याची शक्यता आहे. त्यांच्याकडे मोक्याच्या जागी शेत असल्यामुळे काही भूमाफिया त्यांच्या मागे लागला होता. त्यांनीच 8 मार्चला बैस यांना अज्ञात स्थळी नेऊन मारहाण केली, त्यात ते बेशुद्ध झाले आणि नंतर आरोपींनी त्यांना मृत समजून गोरेवाडा परिसरात निर्जन ठिकाणी फेकून पळ काढला असा अंदाज व्यक्त केला जात आहे.