(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur News : सिगारेटच्या नावावर सडक्या सुपारीची आयात; डीआरआयकडून तीन कंटेनर जप्त, नागपुरातील व्यापाऱ्यांची चौकशी सुरू
सिगारेटच्या नावाखाली सडक्या सुपारीची आयातीचा प्रकार सुरू असून DRI ने नागपूरच्या काही व्यापाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे.
Nagpur News Update : डीआरआयने (Directorate of Revenue Intelligence) गुप्त माहितीच्या आधारावर सोनीपतमध्ये तीन कंटेनर सुपारी जप्त केली आहे. याचे कनेक्शन नागपूरच्या व्यावसायिकांसोबत असल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी डीआरआय नागपूरनेसुद्धा काही व्यापाऱ्यांना कार्यालयात बोलावले असून त्यांची चौकशी केली जात आहे. डीआरआय पुन्हा सक्रिय झाल्याने बाजारात मोठी खळबळ उडाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा दिवसांपूर्वी सोनीपत डीआरआयला सिगारेटच्या नावावर सुपारीची आयात केली जात असल्याची सूचना मिळाली होती. माहितीच्या आधारावर कंटेनर पकडले असता माहिती खरी निघाली. 3 कंटेनर माल हाती लागला असून त्याची किंमत कोट्यवधी रुपये सांगितली जात आहे. यासंबंधी नागपूर कार्यालयाला सूचित करण्यात आले. नागपूरच्या (Nagpur) अधिकाऱ्यांनी हनान जादा, अनिल कुंडलिया यांना बोलावून चौकशी केली. दोघेही 3-4 दिवसांपासून कार्यालयात हजेरी लावत आहे. 3 कंटेनरसह आणखी किती माल मागवण्यात आला, नागपूर आणि जवळपासच्या परिसरात किती माल आला, या दिशेने विभागाचा तपास सुरु आहे. या सडक्या सुपारी जप्तीच्या कारवाईसंदर्भात महावीर, विजय आणि बोथरा, महेंद्र यांचीसुद्धा चौकशी केली जात असल्याची माहिती आहे. आयात करणाऱ्यांनी कंटेनरमध्ये सिगारेट आयात करण्याची माहिती दिली होती. कागदोपत्री देखील सिगारेटचाच उल्लेख होता. सांगितले जाते की, मुंबईतील फारुख नुरानी याची या आयातमध्ये प्रमुख भूमिका आहे. त्याला यापूर्वीसुद्धा कोट्यवधींच्या सुपारीसह पकडण्यात आले होते. नुरानीला अटकही करण्यात आली होती. आता तो पुन्हा सक्रिय झाल्याची माहिती समोर येत आहे.
'पाम नट' भेसळीला सुरुवात
विभागाच्यावतीने कारवाई होत नसल्याने सुपारी व्यावसायिकांकडून गैरप्रकार वाढले आहेत. त्यांच्याकडून आता सुपारीऐवजी पाम नट भेसळ करण्यात येत आहे. हे अत्यंत विषारी समजले जाते. यानंतरही काही व्यापारी पाम नट बोलावून त्याची सुपारीत भेसळ करीत असल्याची माहिती आहे. एफडीएने जिल्ह्याबाहेर पाम नट प्रकरणी काही व्यापाऱ्यांना अटकही केली आहे, परंतु नागपुरात आतापर्यंत अशाप्रकारची ठोस कारवाई झालेली नाही. एफडीए कायद्यातही पाम नटवर बंदी आहे. 15-20 दिवसांपूर्वी वर्धमाननगरात एक ट्रक पाम नट पकडण्यात आले होते, परंतु प्रकरण दाबले असल्याची चर्चा सुरू होती. पोलीस आणि एफडीएच्या (Food and Drug Administration) भरारी पथकाला पाम नटची माहितीच मिळू शकली नाही आणि प्रकरण थंडबस्त्यात गेले असल्याचे म्हटले जाते.
गुटखा बंदीपासून वाढली तस्करी
राज्यात गुटखाबंदी लागू झाल्यापासून सडक्या सुपारीची तस्करी वाढली आहे. बंदी असतानाही शहरात चौका-चौकात खर्रा मिळतो. याकडे एफडीए (FDA) विभाग 'विशेष' उद्देशपूर्ण दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. आधीच आरोग्यासाठी घातक असलेला खर्रा हा सडक्या सुपारीमुळे आणखी जीवघेणा ठरतो. तोंडासंबंधीचे अनेक आजार यामुळेच होतात असे समोर आले आहे. नागरिकांमध्ये ही याचे व्यसन वाढत आहे.
ही बातमी देखील वाचा