(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur Metro : सीए रोड-कामठी मार्गावर लवकरच धावणार मेट्रो; सुधारित खर्चास मान्यता
सीए रोड-कामठी मार्गावर लवकरच मेट्रो धावण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशनानंतर मनपाची निवडणूक फेब्रुवारी महिन्यात घेण्याचे अपेक्षित असल्याने ही संपूर्ण तयारी केली जात असल्याची चर्चा आहे.
Nagpur News : कॉटन मार्केट व इंदोरा चौकातील मेट्रोचे उर्वरित काम वेगाने पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने (Maharashtra State Government) सुधारित खर्चास मान्यता दिली आहे. यामुळे मेट्रो प्रकल्पातील शिल्लक काम लवकरच पूर्णत्वास येणार आहे. मेट्रोच्या सुधारित आराखड्यानुसार मेट्रोच्या दोन स्टेशनचे काम पूर्ण होताच हा मार्ग वाहतूकीसाठी मोकळा होणार आहे. हिवाळी अधिवेशनानंतर नागपूर महापालिकेची निवडणूक (NMC Elections) फेब्रुवारी महिन्यात पार पडण्याची शक्यता आहे. याशिवाय समृध्दी महामार्गासोबतच (Maharashtra Samruddhi Mahamarg) मेट्रोचे उद्घाटन करण्यासाठी संपूर्ण तयारी केली जात आहे.
शासनाकडून निधी प्राप्त
कोरोना महासाथीच्या काळात मेट्रोचे काम काही प्रमाणात रेंगाळले होते. त्यामुळे आता मेट्रोच्या उर्वरित दोन मार्गावर मेट्रो सुरू होण्याची प्रतिक्षा केली जात आहे. कॉटन मार्केट व इंदोरा या 2 नव्या स्थानकांसह इतर काही महत्वाच्या कामांसाठी राज्य शासनाकडून निधी प्राप्त झाल्याने हा मार्ग वेगाने पूर्ण होणार असल्याचे म्हटले जात आहे. मेट्रोच्यावतीने 600 कोटींचा सुधारित खर्चाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. त्यास मान्यता मिळाल्याने उर्वरित कामांना वेग येणार आहे.
मेट्रोची प्रतिक्षा
एकूण 38 किमीच्या मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात खापरी ते सीताबर्डी असे 13 किमीचे काम मार्च 2019 मध्ये पूर्ण झाले होते. त्यानंतर हिंगणा मार्गावरील सीताबर्डी ते लोकमान्यनगर या 11 किमीच्या मार्गाचे काम जानेवारी 2020 मध्ये पूर्ण झाले आहे. तर, मुंजे चौक सीताबर्डी ते कस्तूरचंद पार्क या दीड किलोमीटरच्या मार्गाचे काम ऑगस्ट 2021 मध्ये झाल्यानंतर येथून मेट्रो धावण्यास सुरुवात झाली. सध्या सेंट्रल अॅव्हेन्यू मेट्रो मार्ग आणि कामठी मार्गावरील 12 किमीच्या मार्गावर मेट्रो धावण्याच्या प्रतिक्षेत आहे.
प्रवाशांच्या संख्येत वाढ
नागपूर मेट्रो रेल्वे (Nagpur Metro Rail) प्रकल्पाच्या ऑरेंज आणि एक्वा मार्गावर मेट्रो प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. नागरिकांची मेट्रो सेवेला पसंती मिळत आहे. खापरी आणि लोकमान्य नगर मार्गिकेवर नियमितपणे यामध्ये वाढ होत आहे. 14 नोव्हेंबर (बालक दिनाच्या निमित्याने) रोजी 82,558 प्रवाश्यानी मेट्रोने प्रवास केला. उल्लेखनीय आहे कि, यापूर्वी देखील मोठ्या प्रमाणात नागरिकांची मेट्रोला पसंती मिळाली आहे. मेट्रो प्रवाशांच्या सोयीसाठी महामेट्रोकडून पिपळाफाटा, बेसा, म्हाळगीनगर, नरेंद्रनगर ते छत्रपतीनगर मेट्रो स्टेशनपर्यंत फीडर बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे, त्याचप्रमाणे हिंगणा ते लोकमान्यनगरपर्यंत फीडर बस सेवा उपलब्ध झाल्यामुळे हिंगणा आणि आसपासच्या शहरातील रहिवाशांना फायदा होत आहे. याचा लाभ मेट्रो रेल्वे सेवेला मिळत आहे.
ही बातमी देखील वाचा