Nagpur Lok Sabha Election : विकास ठाकरे, श्याम बर्वेंसह नितीन गडकरींना निवडणूक खर्चाबाबत नोटीस; वेळेत उत्तर न दिल्यास कारवाईचा बडगा
Nagpur Lok Sabha : नागपूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार नितीन गडकरी, काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे आणि रामटेकचे काँग्रेस उमेदवार श्याम बर्वे यांना निवडणूक खर्चाबाबत नोटीस बजावण्यात आली आहे.
Lok Sabha 2024 Nagpur : नागपूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीतील भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari), काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे (Vikas Thakre) आणि रामटेकचे काँग्रेस उमेदवार श्याम बर्वे (Sham Barve) यांना निवडणूक खर्चाबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात एकूण 9 उमेदवारांनी सादर केलेला खर्च आणि प्रशासनाने काढलेला खर्चात तफावत आढळून असल्याने त्यांना ही नोटीस देण्यात आली आहे. सोबतच निर्धारित वेळेत उत्तर न दिल्यास कारवाईचा इशाराही या उमेदवारांना देण्यात आला आहे.
निवडणूक खर्चाबाबत 9 उमेदवारांना नोटीस
येत्या 19 एप्रिलला विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यातील निवडणुका पार पडणार आहेत. त्या अनुषंगाने राजकीय पक्षासह सर्व प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक खर्चावर देखरेखीसाठी जिल्हा तक्रार समिती गठित करण्यात आली आहे. शुक्रवार, 5 एप्रिल रोजी या पहिल्या टप्प्यातील खर्चाची माहिती उमेदवारांना सादर करायची होती. त्यानुसार भापचे उमेदवार नितीन गडकरी यांनी सादर केलेला खर्च आणि प्रशासनाच्या खर्चात जवळपास 13 लाख 63 हजारांची तफावत आहे. नितीन गडकरींनी 4 लाख 75 हजारांच्या जवळपास खर्च दाखवला आहे. मात्र, प्रशासनाच्या मते त्यांनी 18 लाख 38 हजार रुपये खर्च केल्याचे निदर्शनात आले आहे.
वेळेत उत्तर न दिल्यास कारवाईचा इशारा
तर, रामटेक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्याम बर्वे यांनी 1 लाख 27 हजार रुपयांचा खर्च दाखवला असून प्रशासनाच्या मते त्यांनी 4 लाख 92 हजारांचा खर्च केलाय. त्यांच्या खर्चात जवळपास 2 लाख 95 हजारांची तफावत आहे. त्याचप्रमाणे विकास ठाकरे यांनी जवळपास 8 लाख 46 हजारांचा खर्च दाखवला असून प्रशासनाच्या मते हा खर्च 17 लाख 38 हजार इतका आहे. प्रशासन आणि ठाकरेंच्या खर्चात तब्बल 8 लाख 92 हजारांची तफावत आहे. या प्रकरणी नागपुरातून 2 तर, रामटेकमधील 7 उमेदवारांनी खर्चाचे विवरण सादर केले नाही. त्यामुळे या उमेदवारांनी वेळेत उत्तर न दिल्यास निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कारवाई करण्याचा इशाराही त्यांना देण्यात आला आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक खर्चावर देखरेखीसाठी जिल्हा तक्रार समिती गठिते करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्ष जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा असून नागपूर आणि रामटेक मतदारसंघाचे खर्च संनियंत्रण कक्षाचे नोडल अधिकारी विलीन खडसे आणि सीमा नन्होरे सदस्य सचिव आहेत. त्यांनी या संबंधित नोटिस नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात एकूण 9 उमेदवारांना बजावली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या