एक्स्प्लोर
विषय गर्लफ्रेंडचा, गोळीबार मुख्यमंत्र्यांच्या दारात !
नागपूर: भर बाजारात गोळ्यांचा आवाज, शस्त्रांद्वारे गुंडांची दहशत, हे नागपुरात आता नित्याचे झाले आहे. कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत शहराची अवस्था एवढी वाईट झाली आहे, की आता गुंडांच्या टोळ्या क्षुल्लक कारणावरून व्हीव्हीआयपी परिसरात थेट गोळीबार करत आहेत.
काल रात्री मुख्यमंत्र्यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर गुंडानी गोळीबार केला. कुख्यात भाईची मैत्रीण दुसऱ्यासोबत फिरत होती, या कारणामुळे हा गोळीबार झाला.
कॉफी हाऊस गोळीबाराने हादरलं
नागपूरचा सर्वात व्हीव्हीआयपी परिसर मानला जाणारा कॉफी हाऊस चौक काल रात्री गोळ्यांच्या आवाजाने हादरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवास ( खासगी निवासस्थान ) आणि आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांचे निवास हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे हा परिसर सुरक्षेच्या दृष्टीने नेहमीच पोलिसांसाठी अत्यंत महत्वाचा आहे.
मात्र, गेले काही महिने या भागात सराईत गुन्हेगार आणि त्यांच्या गुंडांचा सततचा वावर परिसराची शांतता वारंवार भंग करत आहे.
भाईची गर्लफ्रेंड
रविवारी रात्री एका कुख्यात भाईच्या जुन्या मैत्रिणीला भाईच्या सहकाऱ्याने दुसऱ्यासोबत पाहिले. भाईची मैत्रीण धरमपेठ परिसरात कॉफी हाऊस चौकावरच्या लाहौरी बार-रेस्टोरेंटमध्ये दिसली.
ही माहिती भाईच्या चेल्यांनी भाईपर्यंत पोहोचवली. तोपर्यंत गँगचे सदस्यही बार आणि रेस्टोरंटच्या आत भाईच्या जुन्या मैत्रिणीला शेरेबाजी करू लागले. वाद वाढत गेला आणि बार व्यवस्थापनाला गुंडांना बाहेर हाकलावे लागले.
भाई कॉफी हाऊसजवळ पोहोचला
तोवर भाई ही आपल्या सहकाऱ्यांसह कॉफी हाऊस चौकावर पोहोचला होता. मैत्रिणीने सोडलेली साथ आणि बार व्यवस्थापनाने गँगला हाकलल्याचा राग, यामुळे पार चढलेल्या भाईने थेट तलवार बाहेर काढली. इतकंच नाही तर रिव्हॉल्वरमधूनही थेट गोळीबार सुरु केला.
मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ गोळीबार
रात्री साडे अकरा वाजता थेट मुख्यमंत्र्यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर गोळीबाराची घटना घडल्यामुळे नागपूर पोलीस हादरून गेले. लगेच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. संपूर्ण परिसराची नाकाबंदी करत गुंडांचा शोध सुरु करण्यात आला. वाहने तपासली गेली. मात्र, या भागात नेहमीच्या वावरामुळे परिसराची सखोल माहिती असलेले गुंड आरामात व्हीव्हीआयपी परिसरातून फरार झाले.
आता पोलिसांनी शेखू खान, पप्पू डागोर, रविश सिंह, पवन चौधरी, आनंद सिंह आणि त्यांच्या २० सहकारी अशा २५ लोकांविरोधात गुन्हा नोंदविला आहे. आता गुंडांचा शोध सुरु आहे.
गेल्या काही महिन्यात कॉफी हाऊस चौक आणि परिसरात हत्या, गोळीबार, गँगवारसारख्या अनेक गंभीर घटना घडण्यामागचं एक प्रमुख कारण म्हणजे, या भागात सराईत गुन्हेगार आणि त्यांचे सहकारी गुंड दिवस रात्र आरामात फिरत राहतात. मात्र, पोलीसांना त्यांची कानोकानी खबर लागत नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
राजकारण
भारत
Advertisement