एक्स्प्लोर
मदतीचा आव आणणारा शेजारीच अपहरणकर्ता, चिमुरडा बेपत्ता
पोलिस दाद देत नाहीत म्हटल्यावर कुटुंबियांनीच अपहरणकर्त्याला शोधून काढलं. मात्र सुजल वासनिक अजूनही घरी न परतल्यानं वासनिक कुटुंब चिंतेत आहे.
नागपूर : नागपुरातील 9 वर्षांच्या चिमुरड्याचं अपहरण होऊन 12 दिवस उलटले, मात्र त्याचा शोध लावण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. धक्कादायक बाब म्हणजे त्याचा शोध घेण्यासाठी मदत करण्याचा आव आणणारा शेजारीच त्याचा अपहरणकर्ता निघाला आहे.
आरोपी पकडला गेला, तरी 9 वर्षांचा सुजल वासनिक मात्र अद्यापही बेपत्ता आहे. स्वतःच्या बुडीत व्यवसायासाठी घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी रामदासनं सुजलचं अपहरण केलं. मुलाला सोडण्याच्या मोबदल्यात त्याने 10 लाखांची खंडणी मागितली.
पोलिस दाद देत नाहीत म्हटल्यावर कुटुंबियांनीच अपहरणकर्त्याला शोधून काढलं. मात्र सुजल वासनिक अजूनही घरी न परतल्यानं वासनिक कुटुंब चिंतेत आहे. अनेक नाट्यमय घडामोडी घडल्यानंतरही सुजलचा पत्ता लागलेला नाही.
नागपूर जवळच्या लिहिगावमध्ये राहणारा सुजल 16 सप्टेंबर रोजी दुपारी शाळेतून परतला आणि खेळायला घराबाहेर पडला. तेव्हापासून आजवर तो घरी परतलेला नाही. त्याच्या पालकांनी आणि गावकऱ्यांनी फक्त लिहिगावातच नव्हे तर आजुबाजुच्या सर्वच गावात त्याचा शोध घेतला.
वासनिक कुटुंबियांनी त्याच दिवशी म्हणजा 16 सप्टेंबरच्या रात्री कामठी पोलिस स्टेशनमध्ये सुजल बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. मात्र पोलिसांनी फारसे प्रयत्न केले नसल्याचा दावा वासनिक कुटुंबाने केला.
सुजल बेपत्ता झाल्याच्या दहा दिवसांनंतर, म्हणजे रविवारी दुपारी आणि सोमवारी सकाळी असे दोन वेळेला अपहरणकर्त्यांचे फोन आले. त्याने सुजलला सुखरुप सोडण्यासाठी वासनिक कुटुंबीयांकडे 10 लाख रुपयांची मागणी केली.
शेतकरी असलेल्या वासनिक कुटुंबाने इतक्या मोठ्या रकमेची व्यवस्था करु शकत नसल्याचं सांगितल्यावर अपहरणकर्त्यांनी चार लाख रुपयात सुजलला सोडण्याचं मान्य केलं. नरसाळा गावाजवळ एका निर्जन ठिकाणी पैशाची पिशवी आणि ज्या फोनवरून वासनिक कुटुंबीय अपहरणकर्त्यांसोबत बोलले ते मोबाईल फोन ठेवण्याचे निर्देश अपहरणकर्त्याने दिले.
ठरलेल्या वेळी वासनिक कुटुंबीय पोलिसांना न सांगता पैशाची पिशवी ठेऊन आले. मात्र कुटुंबातील काही युवक जवळच्या झुडुपात दबा धरुन बसले. जेव्हा अपहरणकर्ता त्या ठिकाणी पैशाची पिशवी उचलायला आला, तेव्हा सर्वांनाच धक्का बसला.
गेले दहा दिवस जो रामदास मडावी सुजलच्या पालकांसह त्याला शोधण्यासाठी जंग जंग पछाडत होता. रात्रंदिवस वासनिक कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचा बनाव करत होता, तोच वासनिक कुटुंबियांचा शेजारी रामदास मडावी सुजलचा अपहरणकर्ता निघाला.
पैशाची पिशवी उचलून रामदासने तिथून पळ काढला. मात्र स्वकीयाने केलेल्या या दगाबाजीमुळे वासनिक कुटुंबीय चांगलेच भडकले. सुजलच्या काकाने एका युवकासह रामदासचा पाठलाग केला आणि काही अंतरावर एका गावात गावकऱ्यांच्या मदतीने रामदासला पकडून पोलिसांच्या हवाली केलं.
गेली अनेक वर्ष गावातच वासनिक कुटुंबियांच्या शेजारी राहणाऱ्या आणि सुजलेला अनेकवेळा अंगाखांद्यावर खेळवणाऱ्या रामदासने असं कृत्य का केलं, याचं कारणही तितकंच धक्कादायक आहे.
बेरोजगार असलेल्या रामदासने काही महिन्यांपूर्वी रोजगाराचं साधन म्हणून जिमचा व्यवसाय सुरु केला होता. कर्ज घेऊन जिमच्या महागड्या साहित्याची खरेदी केली होती. मात्र अपेक्षेप्रमाणे त्याची जिम चालली नाही. कर्ज फेडण्यासाठी रामदासने नुकतंच 25 लाखांना शेती विकणाऱ्या वासनिक कुटुंबावर लक्ष केंद्रित केलं आणि सुजलचं अपहरण करत दहा लाखाची खंडणी मागितली.
आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणात रामदास मडावीसह त्याच्या एका साथीदाराला अटक केली आहे, तर इतर अपहरणकर्ते अजूनही फरार आहेत. दुर्दैवी बाब म्हणजे अजूनही चिमुकल्या सुजलचा काहीच पत्ता लागलेला नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement