नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेतील दीडशे कोटींच्या अपहारप्रकरणी गुन्हा दाखल
बँकेचे जुने सभासद राजेंद्र गांधी यांनी 2015 ते 2021 पर्यंतच्या 28 प्रकरणाचा दाखला देत जवळपास 150 कोटी रुपयांच्या घोटाळा झाल्याचा आरोप करत कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
अहमदनगर : नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेतील दीडशे कोटींच्या अपहार आणि घोटाळा प्रकरणी तत्कालीन संचालक आणि अधिकाऱ्यांच्या विरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बँकेचे जुने सभासद राजेंद्र गांधी यांनी 2015 ते 2021 पर्यंतच्या 28 प्रकरणाचा दाखला देत जवळपास 150 कोटी रुपयांच्या घोटाळा झाल्याचा आरोप करत कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
1910 साली म्हणजेच तब्बल 110 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या नगर अर्बन बँकेत 2014 पूर्वी जवळपास 1200 कोटींच्या ठेवी होत्या. सध्या सुमारे 550 कोटींच्याच ठेवी या बँकेत शिल्लक आहे. बँकेत घोटाळा होण्याआधी 2 लाख 25 हजार ठेवीदार होते. सध्या केवळ 70 हजार ठेवीदार शिल्लक असल्याची माहिती राजेंद्र गांधी यांनी दिली आहे. दरम्यान कोट्यवधींच्या अपहार प्रकरणी आरोपींमध्ये 2014 ते 2019 या कालावधीत अर्बन बँकेचे चेअरमन माजी खासदार दिलीप गांधी, संचालक मंडळातील सदस्य, बँकेचे अधिकारी, आशुतोष लांडगे, सचिन गायकवाड, रेणुकामाता मल्टीस्टेट सोसायटी आणि बँकेच्या मुख्य शाखेचे तत्कालीन शाखा व्यवस्थापक अच्युत बल्लाळ यांचा समावेश आहे. तत्कालीन 18 संचालकांनी आणि बँक कर्मचाऱ्यांनी संगनमताने घोटाळे केल्याचा आरोप तक्रारीमध्ये करण्यात आला आहे.
यापूर्वीही बँकेतील घोटाळ्याबाबत वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, आता या प्रकरणात फिर्यादी असलेल्या राजेंद्र गांधी यांनी 28 प्रकरणांची एकत्रित फिर्याद दिली आहे. गांधी यांनी 2019 मध्येही पोलिसांकडे तक्रार केली होती. अखेर या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
बोगस कर्जवाटप, बोगस सोने तारण ठेवून कर्ज देणे, वसुली होत नसल्याचे कारण देत अपहार करणे असा आरोप राजेंद्र गांधी यांनी केला आहे. याबाबत पोलीस चौकशी करून संबधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी गांधी यांनी केली आहे. दरम्यान या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने ठेवीदारांना आशेचा किरण दिसत असून पोलीस तपासानंतर तरी ठेवीदारांना न्याय मिळतो का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha