प्रारुप प्रभाग रचनेवर 14 मेपर्यंत हरकती दाखल करण्यास मुदत, 7 जूनपर्यंत अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध होणार
Nagar Parishad Election : 216 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर 10 ते 14 मे 2022 या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील, असे राज्य निवडणूक आयोगाकडून आज जाहीर करण्यात आले
मुंबई : राज्यातील विविध 216 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या (Nagar Parishad Election ) आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर 10 ते 14 मे 2022 या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील, असे राज्य निवडणूक आयोगाकडून आज जाहीर करण्यात आले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची कार्यवाही 10 मार्च 2022 रोजी असलेल्या टप्प्यांपासून पुढे सुरू करावी, असा आदेश 4 मे 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने ही कार्यवाही सुरू केली आहे. यात 208 नगरपरिषदा आणि आठ नगरपंचायतींचा समावेश आहे. त्यांच्या प्रारूप प्रभाग रचनेवर 10 ते 14 मे 2022 या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील.
हरकती आणि सूचनांवर जिल्हाधिकारी 23 मे 2022 पर्यंत सुनावणी घेतील. प्रभाग रचनेचे प्रारूप 10 मार्च 2022 रोजीच प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यावेळी प्राप्त झालेल्या व आता नव्याने प्राप्त होणाऱ्या हरकती व सूचनांवर एकत्रित ही सुनावणी देण्यात येईल. अंतिम प्रभाग रचना 7 जून 2022 पर्यंत प्रसिद्ध करण्यात येईल, असेही राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.
पालिका आणि नगरपालिका निवडणुकीत बहुसदस्यीय प्रभाग पद्धती रचना योग्यच : हायकोर्ट
दरम्यान, महापालिका निवडणुकांसाठी बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीला विरोध करणाऱ्या याचिका फेटाळून लावत मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला मोठा दिलासा दिला आहे. न्यायमूर्ती अमजद सय्यद आणि न्यायमूर्ती अभय अहुजा यांच्या खंडपीठापुढे यावर शुक्रवारी सुनावणी झाली. राज्य सरकारनं तीन सदस्यांचा प्रभाग असा निर्णय महापालिका निवडणुकीसाठी घेतला आहे. मात्र हा बदल केवळ राजकीय सोयीनुसार घेण्यात आला असून मतदारांनी एक उमेदवार एक प्रभाग अशी मागणी करायला हवी, असा दावा या याचिकेतून करण्यात आला होता. आगामी मुंबई, ठाणे, पुणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मीरा-भाईंदर, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर व चंद्रपूर या महापालिका निवडणुकांमध्ये हा मुद्दा महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
राज्य सरकारला मोठा दिलासा, पालिका आणि नगरपालिका निवडणुकीत बहुसदस्यीय प्रभाग पद्धती रचना योग्यच : हायकोर्ट