N D mahanor : 'या नभाने या भुईला दान द्यावे..'; ना. धों. महानोर यांना मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांची श्रद्धांजली
N D Mahanor Passes Away : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,अजित पवार यांनी ट्वीट करत महानोर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
N D Mahanor Passes Away : प्रसिद्ध निसर्गकवी ना. धों. महानोर (N D Mahanor) यांचं निधन झालं आहे. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक (Ruby Hall Clinic) रुग्णालयात वयाच्या 81 व्या वर्षी आज (3 ऑगस्ट) सकाळी साडे आठच्या वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या बातमीनंतर यावर अनेक प्रतिकिया येत आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार (Ajit Pawar) यांनी ट्वीट करत महानोर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ट्वीट..
मुख्यमंत्री शिंदे यांनी ट्वीट करत म्हटले की, "या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे.... निसर्गातील चैतन्याचे गान मांडणारे, मातीशी नाळ घट्ट जोडून आभाळाला गवसणी घालणारे रानकवी ना. धो. महानोर यांच्या निधनाने मातीचे गीत गाणारा अस्सल माणूस काळाच्या पडद्याआड गेला आहे. अक्षरे आणि मातीचे नाते, जोडलेपण आपल्या लेखणीतून मांडून त्यांनी अक्षरश: कवितेचे अंकुर फुलवले. त्यांच्या साहित्यकृतींना मातीचा अस्सल गंध होता. राज्य सरकारचा कृषीभूषण आणि केंद्र सरकारच्या पद्मश्री पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला होता. महानोर यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. या वेदनादायी प्रसंगातून सावरण्यासाठी कुटुंबीयांना ईश्वर बळ देवो, अशी प्रार्थना करतो...” असे शिंदे म्हणाले आहे.
या नभाने या भुईला दान द्यावे
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 3, 2023
आणि या मातीतून चैतन्य गावे
निसर्गातील चैतन्याचे गान मांडणारे, मातीशी नाळ घट्ट जोडून आभाळाला गवसणी घालणारे रानकवी ना. धों. महानोर यांच्या निधनाने मातीचे गीत गाणारा अस्सल माणूस काळाच्या पडद्याआड गेला आहे.
अक्षरे आणि मातीचे नाते, जोडलेपण आपल्या… pic.twitter.com/LNorpSp8tC
रसिक मनाला रानाशी मैत्र घडवून देणारा कवी हरपला
ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांच्या निधनाने रसिक मनाला रानाशी मैत्र घडवून देणारा कवी हरपला. त्यांच्या निधनाने मराठी साहित्याला एका वेगळ्या उंचीवर नेणारा महान साहित्यिक आपण गमावला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, ना. धों. महानोर यांनी कवितेला हिरवा शालू नेसवला. निसर्ग आणि स्त्री ही महानोरांच्या कवितेची केंद्रस्थानं आहेत. त्यांच्या कवितेत विविध गंध आहेत, विविध ध्वनी आहेत. ‘रानातल्या कविता’ या त्यांच्या कवितासंग्रहाने मराठी माणसावर गारूड केलं. लोकसाहित्यावर त्यांनी अलोट प्रेम केले. त्यांनी चित्रपटासाठी लिहिलेली गीते मनाचा ठाव घेणारी आहेत. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक थोर साहित्यिक गमावला आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची ताकद कुटुंबियांना देवो, ही ईश्वरचरणी प्रार्थना!
राठी साहित्याला मातीचा गंध देणारा 'रानकवी' हरपला
"ज्येष्ठ साहित्यिक ना. धों. महानोर खऱ्या अर्थानं 'रानकवी' होते. निसर्गाच्या सानिध्यात राहून त्यांनी साहित्यसेवा केली. मराठी साहित्याला मातीचा गंध दिला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं जीवन, ग्रामीण संस्कृतीचं वैभव मराठी साहित्यात आणलं. त्यांच्या ‘रानातल्या कवितां'नी वाचकांना निसर्गाची सहल घडवली. मराठवाडी बोलीतल्या ‘पानझड’, ‘तिची कहाणी' 'पळसखेडची गाणी' सारख्या लोकगीतांनी मराठी साहित्य समृद्ध केलं. कवयित्री बहिणीबाई, बालकवींचा वारसा पुढे नेत त्यांनी साहित्यक्षेत्रात अढळ स्थान निर्माण केलं. निसर्गकवी म्हणून वावरताना निसर्गाची काळजीही घेतली. पाणलोट पर्यावरण क्षेत्रातल्या कार्याबद्दल ते 'वनश्री' पुरस्काराने सन्मानित होते. राज्य शासनाच्या ‘कृषीभूषण’, केंद्र सरकारच्या 'पद्मश्री' पुरस्काराचे मानकरी ठरले होते. शेती आणि साहित्य क्षेत्रात यशस्वी मुशाफिरी करत असताना विधीमंडळात आमदार म्हणूनही प्रतिनिधीत्व केलं. त्यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. पवार कुटुंबियांनी घनिष्ठ मित्र गमावला आहे. महानोर कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सर्व सहभागी आहोत. ना. धों. महानोर साहेबांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, अशी प्रार्थना करतो," अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कवीवर्य ना. धों. महानोर यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन आदरांजली वाहिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
N D Mahanor: 'अखेर हा वृक्ष उन्मळून पडला...'; शरद पवारांकडून ना. धों. महानोर यांना श्रद्धांजली