जमिनीच्या वादातून सख्ख्या भावासह जावयाची हत्या, लातूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना
शेतजमिनीच्या वादातून अनेक नाती दुभंगली जातात. अनेकदा तर वाद विकोपाला जाऊन जीव देखील जातात. लातूर जिल्ह्यातील हेर येथे अशीच घटना घडली आहे. शेतीच्या वादातू भावाने सख्ख्या भावासह जावयाची हत्या केली आहे.
लातूर : शेतजमिनीच्या वादातून अनेक नाती दुभंगली जातात. अनेकदा तर वाद विकोपाला जाऊन जीव देखील जातात. लातूर जिल्ह्यातील हेर येथे अशीच घटना घडली आहे. शेतीच्या वादातू भावाने सख्ख्या भावासह जावयाची हत्या केली आहे. गोविंद महादु जगताप आणि नितीन फावडे अशी हत्या झालेल्यांची तर बालाजी जगताप असं आरोपीचं नाव आहे.
माहितीनुसार हेर येथील गोविंद महादु जगताप आणि त्यांचे बंधु बालाजी महादु जगताप यांचा जमिनीचा जुना वाद आहे. यावरुन काल सकाळी बाचाबाची झाली. रागाच्या भरात आरोपी बालाजी जगताप आणि त्याच्या घरातील चार ते पाच लोकांनी हातात कुऱ्हाडी कोयते घेत हल्ला केला. यात गंभीर जखमी झालेल्या गोविंद जगताप यांना त्याचे जावई नितीन फावडे यांनी दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी धावपळ केली. यावेळी नितीन फावडे हे गोविंद जगताप यांचा जीव वाचवतायत हे पाहिल्यानंतर आरोपी बालाजी जगताप आणि काही लोकांनी त्यांच्यावरही हल्ला केला. या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले होते.
गोविंद जगताप यांना उदगीरला तर नितीन फावडे यांना लातुरला उपचारसाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला आहे. याची माहिती उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात माहित झाल्यावर पोलिस घटनस्थळी दखल झाली. हा शेतीचा वाद अनेक दिवसांपासून याच पोलिस ठाण्यात दाखल होता. योग्यवेळी त्याची दखल घेण्यात आली नाही. यामुळे दोन जणांचे प्राण गेल्याचा आरोप मयत व्यक्तिचे कुटुंबिय करत आहेत. उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात आठ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.